मुंबई: मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि राज्य सरकारमधील संघर्ष आता अधिक पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले असता सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप पोलिसांच्या माध्यमातून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे हे उपचार सोडून अंतरवालीला निघाल्याची माहिती आहे. 


मंडपाला हात लावाल तर याद राखा


जेलमध्ये सडायला तयार आहे पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही असं आव्हान मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक पेटणार असल्याची चिन्हं आहेत. 


दरम्यान, अंतरवालीकडे निघालेल्या मनोज जरांगे यांची पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. मंडप सध्या तरी हटवण्यात येणार नाही असं आश्वासन पोलिसांनी जरांगे यांना दिल्याची माहिती आहे. मंडपाच्या एकाही कापडाला हात लावला, त्यावरील शिवरायांच्या मूर्तीला हात लावाल तर महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 


जरांगेंची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन


मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश हे विधानसभा अध्यक्षांनी दिले असून त्याचे पालन करू असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या मागून जर कुणी राजकीय डाव साधत असेल तर त्याला उघडं पाडू असा इशारा देवेंद्र फडणीसांनी दिला आहे. 


फडणवीसांची पहिल्यांदाच जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया


मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ''मला बोलायचं नव्हतं. ⁠मराठा समाजच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. ⁠मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं, ⁠सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, ⁠कर्ज दिले. ⁠मराठा समाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही.  ⁠जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, ⁠त्यांच्यापाठीशी नाही'', असं फडणवीसांनी म्हटलं आहे.


मला सर्वात जास्त फोन तुमचेच आले


एसआयटी चौकशीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, मी मराठ्यांचे काम करतोय.  ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणाले  तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो.


ही बातमी वाचा: