जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या पायी दिंडीने पहिला मुक्काम मातोरी गावात केला. विशेष म्हणजे मातोरी गाव मनोज जरांगे यांचं जन्मगाव आहे. पहिला मुक्काम केल्यावर जरांगे आज पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांची भेट झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी वडिलांचे पाय धरत आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास सुरु केला. तर, सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल अशी अपेक्षा असल्याचे जरांगे यांचे वडील म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे आज दुसऱ्या दिवशी पायी दिंडीसह मुंबईकडे निघाले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या जन्मगाव असलेल्या मातोरीत वडिलांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "माझं कुटुंब मी समाजासाठी बाहेर सारले, समाज हेच माझे कुटुंब आहे. बरं झालं सरकारसोबतची चर्चा मीडियासमोर जाहीरपणाने केली. चार भिंतीत चर्चा केली असती तर वेगवेगळे आरोप करून मला बदनाम करण्यात आले असते. समाजाला सर्व माहित आहे, कोण चूक करत आहे, कोण काय स्टेटमेंट करतोय. मी देखील याला महत्त्व देत नाही. माझा समाज काय म्हणतो याला जास्त मी महत्त्व देतो, असे जरांगे म्हणाले. 


तुमचा राजकीय सुपडासाफ केल्याशिवाय राहणार नाही.


पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी यात मनापासून लक्ष घालावे विनाकारण समाजाची नाराजी पत्कारू नयेत. सत्ता येत असते सत्ता जात असते. तीन महिन्याचा विषय राहिलाय. समाजाला आरक्षण दिले नाही, तर मराठे तुमचा राजकीय सुपडासाफ केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, मी संकेत आणि संयम दोन्ही पाळणार आहेत, असेही जरांगे म्हणाले. 


मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, आरक्षण देतील; जरांगेंच्या वडीलांना अपेक्षा...


दरम्यान, मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी आपल्या मुलाला आशीर्वाद दिले. तसेच यावेळी बोलतांना जरांगे यांचे वडील म्हणाले की, मुलाला आशीर्वाद दिला आहे. त्याने हेच काम करत जनतेचे कल्याण करावे. सरकारने शपथ खाल्ली आहे, त्यामुळे आरक्षण देतील, आरक्षण दिल्याशिवाय राहत नाहीत, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी व्यक्त केली. 


राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करणार...


अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरात तयारी सुरु आहे. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की,"शेवटी भारतवासीयांचा आणि जनतेचा आनंदाचा दिवस आहे. आम्हीपण उद्या सोहळा साजरा करू, तिथेच जाव असं काही नाही, इथूनही आपण देवाचं नाव घेऊ शकतो. शेवटी ते रक्तात आहे. शेतात काम करतांना देखील देवाचं नाव घेऊ शकतो, उद्या जिथे असेल तिथे आम्ही हा सोहळा साजरा करू, असे जरांगे म्हणाले. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : मनोज जरांगेंची मूळची भूमिका मान्य झाली आहे; दीपक केसरकरांचं वक्तव्य