जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) शनिवारी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहे. दिवसभराचा प्रवास करून जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला. त्यानंतर जरांगे यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी नऊ वाजता पुन्हा एकदा जरांगे मातोरी गावातून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. त्यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलन देखील असणार आहे. विशेष म्हणजे जरांगे यांच्यासोबत बच्चू कडू देखील या पायी दिंडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.


आजचा दिनक्रम...



  • 21 जानेवारी 2024 (मातोरी ते करंजी घाट)

  • मातोरीमधून सकाळी 9 वाजता निघणार 

  • दुपारचं भोजन : तनपुरवाडी (ता. पाथर्डी) 

  • रात्री मुक्काम : बाराबाभळी (करंजी घाट)


पायी दिंडीत आज हजारो आंदोलक सहभागी होणार...


मुंबईकडे निघालेल्या पायी दिंडीत ज्या भागातून दिंडी जाईल त्या भागातील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केले होते. त्यानुसार आज मातोरीमधून हजारो मराठा आंदोलक या पायी दिंडीत सहभागी होणार आहेत. शनिवारी जरांगे यांनी अंदाजे 65 ते 70 किलोमीटरचा प्रवास केला. सकाळी साडेदहाच्या सुमारास आंतरवालीतून निघालेले जरांगे रात्री दीड वाजता मातोरीमध्ये पोहचले. आज देखील एवढाच प्रवास केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, दिंडीत कालपेक्षा आज आंदोलकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.  


बच्चू कडूंनी मातोरीमध्ये जरांगेंसोबत केले जेवण...


आता सरकार म्हणून माझी भूमिका संपली असे म्हणून बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भातली आपली भूमिका कालच व्यक्त केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई पायी यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातोरी येथे होता. मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरीमध्ये भव्य स्वागत झाल्यानंतर आमदार बच्चू कडू देखील मातोरी गावात पोहचले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच जेवण केले. तसेच, आज बच्चू कडू हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत या यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.


आरक्षण यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल होणार 


मनोज जरांगेंची पायी दिंडी यात्रा बीड जिल्ह्यातील मातोरी या त्यांच्या मूळ गावी रात्री मुक्कामी होती. गावापासून दीड किलोमीटर आंतरावर मराठा आंदोलकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज ही आरक्षण यात्रा अहमदनगर जिल्ह्यात दाखल होणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनावरती ठाम असून, आपण गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असे म्हणत आहे. तर दुसरीकडे सरकार शाश्वत आणि टिकणारे आरक्षण देऊ म्हणत आहे. त्यामुळे परस्पर वेगवेगळ्या भूमिकांमुळे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


दादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा; जरांगेंचा सरकारला इशारा