नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे (Manmad-Indore Railway) मार्गाला मंजुरी देण्यात आली. या रेल्वे मार्गामुळे सुमारे एक हजार गावांना फायदा होणार आहे. मुंबईहून (Mumbai) इंदूरपर्यंत (Indore) तयार करण्यात येणारा रेल्वेमार्ग मनमाड ते 309 किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावर 30 नवीन स्थानके बांधण्यात येतील. तर या मार्गामुळे 1 हजार गावांना लाभ होणार आहे.
रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि इंदूरसारखे उद्योगांच्या हबमधील अंतर कमी होणार आहे. हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होणार आहे. हा रेल्वेमार्ग मनमाड आणि मध्य प्रदेशातील इंदूरदरम्यान असून यासाठी 18 हजार 36 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेशची कनेक्टिव्हिटी वाढणार
यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या रेल्वे मार्गाचा मालवाहतूक आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. इंदूर आणि मुंबई दरम्यानच्या 309 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 6 जिल्हे येणार आहेत. यामुळे या जिल्ह्यांच्या संपर्क आणि विकासाला चालना मिळेल. मध्य भारताचा पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भारताशी संपर्क वाढल्यास दोन्ही भागात पर्यटन उपक्रमही वाढणार आहेत. सध्या मनमाड-इंदूरची सिंगल लाईन आहे. परंतु भविष्यात हा मार्ग दुहेरी लाईनचा करण्यात येणार आहे. सरकारने निवडून आल्यापासून 85 दिवसांत 2,48,677 रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिलीय. यात वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठे बंदर असणार असल्याचे रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले आहेत.
30 लाख लोकांना थेट फायदा होणार
या मार्गामुळे उज्जैन-इंदूरचा विकास होणार आहे. पश्चिम भारतातील लोकांना महाकाल मंदिरात सहजपणे पोहोचता येईल. धान्य उत्पादन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या भागातील कांद्याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल इंदूरला नेण्यास सोपं होणार आहे. शेतमाल, खते, स्टील, सिमेंट, इंधन आणि तेल सारख्या उत्पादनांची वाहतूक करणं सोपं होणार आहे. या रेल्वे मार्गावर 30 स्थानके उभारण्यात आले आहे. या मार्गाचा थेट 1000 गावांना फायदा होणार असून एकूण 30 लाख लोकांना थेट फायदा होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या