Vande Bharat Express between Kolhapur and Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (31 ऑगस्ट) 3 नवीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या तीन ट्रेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळुरू आणि मेरठ ते लखनौ दरम्यान धावतील. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, वंदे भारत (Vande Bharat Express) हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. आज प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत आहे. आता देशभरात 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत गाड्या पहिल्यांदा 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या देशात 100 हून अधिक वंदे भारत धावत आहेत. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील 280 हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत.
कोल्हापूरसाठी फक्त आश्वासनांचे गाजर मिळणार का?
देशातील अनेक मार्गांवर वंदे भारत सुरु असताना गेल्या वर्षभरापासून कोल्हापूरसाठी फक्त आश्वासनाचे गाजर मिळालं आहे. चालू वर्षात जानेवारी महिन्यात कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत सुरु होणार असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनही ते आश्वासन राहिलं आहे. मागील महिन्यात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोल्हापूर-मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली होती.
पीएम मोदींकडून वंदे भारत धावणार असल्याचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापुरातून धावणार असल्याचे आश्वासन जिल्ह्यातील जनतेला दिले होते. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदी कोल्हापुरात होते. यापूर्वीच्या सरकारने कोल्हापूर आणि आसपासच्या भागाकडे विकास आणि वारसा संधींनी भरलेले असतानाही दुर्लक्ष केले होते, असे म्हणत मोदींनी टीका केली होती. मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. शक्तीपीठ एक्स्प्रेस वेमुळे राज्याच्या मोठ्या भागाला आधुनिक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आम्ही कोल्हापुरातून नवीन गाड्या सुरू केल्या आहेत. लवकरच कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेनही धावणार आहे. आम्ही कोल्हापूर-वैभववाडीलाही मंजुरी दिली असून, त्यामुळे कोल्हापूरला कोकणाशी रेल्वेने जोडण्यास मदत होईल, असे मोदी म्हणाले होते. वास्तवात कोल्हापूर-वैभववाडीला मार्गाने कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचा प्रस्ताव सुद्धा अजूनही हवेतच आहे. शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरु आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन करताना मी भाग्यवान असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. रस्ते आणि इतर सुविधांचा वापर करून देवी अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतील. कनेक्टिव्हिटीमुळे कोल्हापुरातील उद्योग आणि विकासाला चालना मिळेल, असेही मोदी म्हणाले होते. मात्र, या सर्व निवडणुकीतील घोषणा झाल्या आहेत.
तिन्ही खासदारांनीच आता ताकद लावावी लागेल
दरम्यान, मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस दिवाळीपर्यंत सुरु होण्यासाठी कोल्हापूरच्या तिन्ही खासदारांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. कोणत्याही परिस्थितीत राजकीय बळ वापरावं लागेल, असे आवाहन केले.
दोन शहरातील वेळ 4 ते 5 पाच तासांनी कमी होईल
मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरांमधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. मात्र, प्रवासात खूप वेळ जात असल्याने मोठी कुचंबणा होत आहे. वंदे भारत सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असल्या, तरी तत्काळ सुरू होईल याची शक्यता कमी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या