मुंबई: महाराष्ट्रात जे काही चाललंय ते चुकीचं सुरू आहे, ईडीचे म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे राज्यातले सरकार म्हणजे प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम करतो अशी धमकी देणारं सरकार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. मनोज जरांगे यांच्यामागे लोक असल्याचं दिसल्यानंतर त्यांचाही असाच करेक्ट कार्यक्रम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचं आपल्याला सांगितलं, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये तसं स्पष्ट दिसतंय असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले हे एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
विधान भवनाच्या परिसरातील नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी नेमकं काय झालं होतं याबद्दल सांगताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत बोलताना जरांगेंना तुम्हीच वाढवलं असल्याचं आपण म्हणालो. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आपण असाच सर्वांचा कार्यक्रम करतो. आपल्यापेक्षा जर कुणी मोठं होत असेल तर त्यांचा कार्यक्रम करणारं हे सरकार आहे, तसे ते जाहीर बोलत आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर एसआयटी लावली हे दुर्दैवी आहे.
विश्वजित कदमांच्या व्हिडीओवर काय म्हणाले नाना पटोले?
विश्वजित कदमांचा मुहूर्त करतो असं फडणवीस म्हणाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाल की, विश्वजित कदम हे कुठेही जाणार नाहीत, ते काँग्रेसमध्येच राहणार. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठा दबाव आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावलं जातंय.
गुजरातला फायदेशीर असलेल्या बुलेट ट्रेनसाठी मविआचे सरकार पाडलं असा आरोप नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्रातून सर्व उद्योग हे गुजरातला नेण्यासाठी हे सरकार सत्तेत आलं असल्याचंही ते म्हणाले.
मी राजीनामा दिली ती चूक नव्हती
मी राजीनामा दिला ही चूक नव्हती, तर विधानसभा अध्यक्षपद वर्षभर रिक्त ठेवणे ही चूक असल्याचं नाना पटोले म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात जे काही घडलं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून गेलं त्याला तुम्ही जबाबदार मानता का असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मला पक्षाने आदेश दिला आणि मी विधानसभा अध्यक्ष बनलो, त्यानतंर पक्षाने आदेश दिल्यानंतरच मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी काही चुका झाल्या, वर्षभर ते पद रिक्त ठेवणं ही चूक होती. मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मला समजलं की मी किती पॉवरफुल होतो ते.
वंचितला सोबत घेण्यात अडचण नाही
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यात आम्हाला काहीही अडचण नाही असं सांगत महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा ही 6 मार्च रोजी होणार आहे असं नाना पटोले म्हणाले.
गॅरंटी या शब्दाचाही अपमान केला जातोय
सध्याचं सरकार हे भाजप पक्षाचं नाही तर मोदी या एका व्यक्तीचं आहे, त्यामुळेच त्याला मोदी सरकार म्हटलं जातंय. त्यामुळेच आता गॅरंटी या शब्दाचा अपमान होतोय असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
महिला आरक्षणाच्या विषयावर मोदी खोटं बोलतात
महिला आरक्षणाचं विधेयक आणलं आणि ते 2029 रोजी लागू केलं जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे आरक्षण जनगणनेच्या आधारे आणण्यात येईल असं ते म्हणाले. पण त्यासाठी जनगणना तरी झाली पाहिजे. देशात जनगणनाच झाली नसल्याने ते देशाला फसवण्याचं काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
आचारसहिंता लागल्यानंतर अनेक नेते भाजप सोडतील आणि काँग्रेसमध्ये येतील असा दावा नाना पटोले यांनी केला.
एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.
हीब बातमी वाचा: