मुंबई : आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. कोरोनाचं एका बाजूला व्यवस्थापन करावं लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. सगळ्या बाजारपेठा खुल्या करा अशी मागणी व्यापारी करत आहेत, त्यांची ही मागणी चुकीची नाही. कोरोनाचं संकट गंभीर मात्र उद्योग सुरु करावे लागतील, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.


उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा
यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागानं उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा द्यायला सुरु केल्या आहेत. एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करुन देणार आहोत. महापरवाना ही योजना सुरु केली आहे. 48 तासात उद्योगासाठी परवानगी देण्यात येईल, म्हणजे तात्काळ त्यांना उत्पादन घेता येऊ शकेल. महाजॉब्स ही देखील चांगला उपक्रम आपण सुरु केला आहे. याला युवकांचा प्रतिसाद करतोय.

कोरोनामुळं ज्याचं नुकसान झालं आहे, त्यांच्यासाठी पॅकेज 

कोरोनामुळं ज्याचं नुकसान झालं आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक पॅकेज केलं आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली की घोषणा होईल. उद्योजकांच्या नुकसानीबाबत काही योजना तयार केल्या आहेत. उद्योगवाढीसाठी देखील काही योजना आहेत. काही कंपन्यांसोबत करार केले आहेत, ते फक्त कागदावर राहणार नाहीत. अनेक विदेशी कंपन्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. त्यांच्याशी करार करुन उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

भूमिपुत्रांना रोजगार हा आमच्या सरकारचा मूळ कार्यक्रम आहे. महाजॉब्समध्ये अट टाकली आहे की डोमेसाईल द्या. त्याद्वारे स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. परप्रांतिय मजूर येत नसतील तर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या, अशा सूचना कंपन्यांना दिल्या आहेत, असं देसाई म्हणाले.

राज ठाकरे यांच्या टिकेवर बोलताना देसाई म्हणाले की, शुभ बोल रे नाऱ्या म्हणीप्रमाणे काम चांगलं होत असेल तर चांगल्या शुभेच्छा द्या. चांगल्या निर्णयाचं स्वागत करा. अडचणी सगळीकडे आहेत. देशातील सगळी सरकारं अडचणी आहेत. त्यामुळं टीका करण्याऐवजी सूचना करा, सल्ला द्या, असं त्यांनी म्हटलंय.

कुटुंबात देखील कुरबुरी होतातच, मात्र सरकारमध्ये अंतर्विरोध नाही : मंत्री बाळासाहेब थोरात

भाजप-शिवसेना एकत्रित येण्याबाबत ते म्हणाले की, आता ती वेळ निघून गेली. जेव्हा आमच्या हाताला सांभाळण्याची गरज होती त्यावेळी झिडकारलं. जुन्या मित्रांना त्यांचा मार्ग आहे. त्यांनी त्या मार्गाने जावे, त्यांना शुभेच्छा. एकटे लढण्याच्या धोरणाला आमच्या शुभेच्छाआहेत, असं देसाई म्हणाले.

जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम होत आहे.


Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे

दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.

याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर सुरु आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.