मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध नाही. आम्ही एकत्र आहोत, मतमतांतरं असू शकतात मात्र आम्ही ते बसून सोडवतो. आम्ही एकजुटीनं सर्व समस्या सोडवणार आहोत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. कुटुंबात देखील कुरबुरी होतात, थोडफार इकडं तिकडं होतच. मात्र त्यातून मोठं काही होत नसतं, आम्ही सरकारमध्ये सर्व निर्णय एकमताने घेतो, असं ते म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते.


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम होत आहे.

यावेळी थोरात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना बाकीचे मंत्री भेटणं ही नॉर्मल गोष्ट असते. त्यावर माध्यमं वेगळा रंग दाखवतात. लहान गोष्टींना विनाकारण मोठं केलं जातं. एका पक्षाचं सरकार असलं तरी सरकारमध्ये नाराजी असते. आम्ही एकत्र पद्धतीनेच यापुढे काम करणार आहोत, असं थोरात म्हणाले.

आमचं सरकार आलं आणि कोरोनाचं संकट आलं. मात्र आम्ही पाच वर्षात राज्याला विकासाच्या उच्च पातळीवर घेऊन जाऊ, असं देखील थोरात म्हणाले. काँग्रेस हा पक्ष इतर पक्षापेक्षा वेगळा आहे. आमच्या पक्षाच लोक बोलू शकतात, तक्रार देखील करु शकतात, असंही थोरात म्हणाले.

Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही," असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मी पुन्हा कधीही मास्क वापरला नाही. त्यावेळी मला प्रश्न विचारणाऱ्या मास्क घातलेल्या 120 पैकी 55 पत्रकारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, असंही ते म्हणाले. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, अनेकांचे व्यवसाय बुडाले. सरकराच्या कामाची पद्धत कळत नाही. लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं हे माहित नाही. परंतु राज्यातील जनतेला वेठीस धरणं योग्य नाही," असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या परप्रांतियांची नोंद ठेवायला हवी. ज्या कंपन्यांमध्ये रिकाम्या जागा आहेत, तिथे मराठी मुलांना प्राधान्य द्या," असंही राज ठाकरे म्हणाले. तसचं मनसेच्या प्रतिनिधींनी अनेक कंपन्यांशी संवाद साधल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.

याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर सुरु आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.