मुंबई : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही," असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. तसंच हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम होत आहे. पहिल्या सत्रात राज ठाकरे यांनी आपलं व्हिजन मांडलं.


सगळ्या गोष्टी पूर्ववत करा
"सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही. लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. काळजी घ्या, पण शटडाऊन आणि लॉकडाऊन नको, असंही ते म्हणाले.


राज ठाकरे म्हणाले की, "लोकांना मानसिक विंवचनेतून बाहेर काढण्याची जबाबादारी सरकारची आहे. त्यासाठी काही गोष्टी सुरु करणं आवश्यक आहे. आज उद्योग बंद आहेत, दुकानं बंद आहेत, सगळे घरात बसून आहेत, नोकरी टिकेल की नाही याचीही खात्री नाही. अनेकांना नोकरीवरुन काढलंय. यावर सरकार काय विचार करतंय, या गोष्टी सरकारने सांगितल्या पाहिजे. त्यामुळे सगळं चालू करा असं माझं मत आहे."


तसंच मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मी पुन्हा कधीही मास्क वापरला नाही. त्यावेळी मला प्रश्न विचारणाऱ्या मास्क घातलेल्या 120 पैकी 55 पत्रकारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, असंही ते म्हणाले.


लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, अनेकांचे व्यवसाय बुडाले. सरकराच्या कामाची पद्धत कळत नाही. लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं हे माहित नाही. परंतु राज्यातील जनतेला वेठीस धरणं योग्य नाही," असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.


"बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या परप्रांतियांची नोंद ठेवायला हवी. ज्या कंपन्यांमध्ये रिकाम्या जागा आहेत, तिथे मराठी मुलांना प्राधान्य द्या," असंही राज ठाकरे म्हणाले. तसचं मनसेच्या प्रतिनिधींनी अनेक कंपन्यांशी संवाद साधल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.


राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं
राम मंदिराचं भूमिपूजन होत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण ही योग्य वेळ नाही. तसंच राम मंदिराचं ई-भूमिपूजन मान्य नसल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं.


माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमधील प्रमुख पाहुणे कोण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.


याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


Majha Maharashtra Majha Vision | Raj Thackeray Vision | नव्या महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांचं व्हिजन