जळगाव : जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे आज दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे.


यश देशमुख गेल्या वर्षी प्यारा मिल्ट्रीमध्ये भरती झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. यश देशमुख शहीद झाल्याचं वृत्त सैन्य दलाच्या वतीने यशच्या कुटुंबाला फोनद्वारे कळविण्यात आल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या घटनेला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. शहीद यश दिगंबर देशमुख याचं पार्थिव शवविच्छेदनानंतर श्रीनगरहुन चंदीगड आणि औरंगाबाद मार्गे चाळीसगावला येणार असल्याची माहिती विभागाने कळविली आहे.


उद्या सायंकाळी अथवा परवा सकाळपर्यंत पार्थिव चाळीसगाव येथे पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या शहीद होण्याने त्याच्या पिंपळगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोक कळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.


श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला


श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.


या हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून संध्याकाळपर्यंत या विषयी अधिक माहिती मिळेल. या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहे.


श्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, जळगावच्या पिंपळगावचे यश देशमुख शहीद