Majha Katta:  पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी राज्यात प्रसिद्ध झालेले पंजाबराव डख यांनी आपल्या अंदाज कशाच्या आधारावर व्यक्त करतो, याबाबत भाष्य केले आहे. निसर्गाचा अभ्यास, भवतालच्या नैसर्गिक स्थिती यावरून पावसाचा अंदाज व्यक्त करत असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. 


पंजाबराव डख यांनी म्हटले की, 1995 च्या सुमारास वडिलांसोबत टीव्ही पाहायचो. टीव्हीवरील बातम्या आम्ही आवर्जून पाहायचो. या बातमीपत्राच्या शेवटी हवामान अंदाज सांगितला जायचा. त्यानुसार शेती आम्ही करायचो. पण वृत्तवाहिनीवरील हवामानाचे अंदाज बऱ्याचदा चुकायचे. त्यामुळे आमचे नुकसान होत असे. 2004 ला शेतकऱ्यांची वाईट स्थिती होती. हवामानाचा अंदाज अचूक येत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत होता, असेही त्यांनी सांगितले. 


त्यावेळी असणाऱ्या मोबाईल, इंटरनेटच्या मर्यादा लक्षात घेता अनेकांपर्यंत हवामान अंदाज पोहचवणे थोडं कठीण होते. त्यावेळी एसएमएसच्या आधारे पावसाचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जात असेही त्यांनी सांगितले. अॅण्ड्राईड फोन, टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेमुळे इंटरनेट स्वस्त झाला. त्याचा मोठा फायदा झाला असल्याचे डख यांनी सांगितले. व्हॉटस अॅपवर राज्यातील विभागनिहाय-क्षेत्रानुसार व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले. त्या माध्यमातून संबंधित भागात पाऊस होणार की नाही, याचा अंदाज वर्तवू लागलो. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला असल्याचे दावा डख यांनी केला.


पावसाचा अंदाज कशाच्या आधारे?


पावसाचा अंदाज कशाच्या आधारे वर्तवता असा प्रश्न विचारल्यानंतर पंजाबराव डख यांनी काही गोष्टींचा उलगडा केला. पावसाच्या अंदाजासाठी सॅटेलाईट छायाचित्रे, काही निरीक्षणांचा आधार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान खात्याकडून येणाऱ्या सॅटेलाइट फोटोंच्या आधारे पावसाचा अंदाज वर्तवत असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान खात्याकडून काही ठाराविक वेळेत सॅटेलाईट छायाचित्रे जारी केली जातात. मात्र, त्यातील 3.30 वाजता असणारे सॅटेलाईट छायाचित्र अधिक स्पष्ट आणि बऱ्यापैकी अचूक अंदाज सांगण्यासाठी योग्य असल्याचे निरीक्षणाच्या अंती समजले असल्याचे डख यांनी सांगितले. 


यंदा मान्सूनच्या वेळी चक्रीवादळाने तीव्र वेग धारण केले. त्यामुळे राज्यात पाऊस आला नाही आणि अंदाज चुकला असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वेकडून येणारा पाऊस हा महाराष्ट्राला फायदेशीर असतो. पूर्वेकडून येणाऱ्या ढगांमुळे खूप पाऊस पडतो. अरबी समुद्र चक्रीवादळ आले की पूर्वेकडून पाऊस येतो, असे निरीक्षणही त्यांनी सांगितले. 


पंजाबराव डख यांनी म्हटले की, मी निसर्गावर प्रेम करत आहे.  निसर्ग शेतकऱ्याला पाऊस सांगत असतो. निसर्गातील झाडे, कीटकही पावसाची वर्दी देतात. गावरान आंब्याला फुलोरा येत नाही, त्यावेळी पाऊस येत नाही. हे दुष्काळाच्या संकटाचा अंदाज असतो असेही त्यांनी म्हटले. 15 ते 30 मे दरम्यान दरवर्षी अवकाळी येतो. दम्याचा त्रास असलेल्या लोकांना अधिक त्रास जाणवल्यास पाऊस येणार असल्याचे अंदाज व्यक्त करता येतो, असेही त्यांनी म्हटले. ही माझी निरीक्षण असून मागील अनेक वर्षांपासूनची काही परंपरागत निरीक्षण असल्याचे त्यांनी म्हटले. चार वर्षात पाऊस वाढला आहे. पावसाने दिशा बदलली आणि तापमान वाढ झाली असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईचा पाऊस आता गुजरातच्या दिशेने चालला आहे. आधी तो पाऊस मराठवाड्याकडे यायचा आणि त्याचा फायदा होत असेही त्यांनी म्हटले.