Anil Patil on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. तसेच यांनी यावेळी बोलतांना म्हटलं की, 'आता दुसऱ्या फळीतील नेत्यांना देखील मोठं करायला हवं.' मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील हे पहिल्यांच त्यांच्या जळगावच्या मतदार संघात आहेत. तसेच यावेळी अनिल पाटील यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत देखील करण्यात आले आहे. पण यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल पाटील?
जळगावात माध्यमांशी संवाद साधताना अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर तो मागे घ्यायला नको होता. कारण तो निर्णय त्यांनी स्वत:हून घेतला होता. तसेच त्यांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली हे योग्य नाही. कारण तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आता मी थांबलं पाहिजे.' मंत्री अनिल पाटील यांनी पुढे बोलतांना म्हटलं की, 'दुसऱ्या फळतील नेत्यांना मोठं केलं पाहिजे. तसेच त्यांना जे वाटतयं की जे आमदार इकडे तिकडे जातील त्यांना एकत्र आणून पुढील राजकीय वाटचालीसाठी आशीर्वाद द्यायला हवा.'
शरद पवारांनी आता थांबायला हवं आणि इतरांना पक्ष चालवण्यासाठी आशीर्वाद द्यायला हवेत अशी प्रतिक्रिया देखील अनिल पाटील यांनी दिली आहे. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, 'ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ'. यावर प्रतिक्रिया देताना अनिल पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे.
'सध्या पक्षवाढीसाठी प्रयत्न'
अनिल पाटील यांनी यावेळी अजित पवार यांचा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. तर शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याविषयी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'अजित पवारही काही दिवसांनी दौऱ्याला सुरुवात करतील.' हा चढाओढीचा प्रश्न नाही तर पक्षवाढीसाठी प्रयत्न असणार असल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचा पक्ष फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या देखील समावेश होता. अनिल पाटील यांचा देखील या यादीमध्ये नाव होतं. तसेच सध्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांकडून शरद पवार यांच्यावर टीकेचं सत्र सुरु करण्यात आलं आहे.
त्यामुळे आता अजित पवारांसोबत गेलेल्या मंत्र्यांकडून होत असलेल्या टीकेवर शरद पवार काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. तर पवार आता या सगळ्या टीका टीप्पणीवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.