Majha Katta : मागील 30 वर्षांपासून पोलीस सेवेत असणारे वसई-विरार आणि भायंदरचे पोलीस आयुक्त सदानांद दाते यांनी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. 26/11 दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी निडरपणे कसाब आणि इस्माईलशी दोन हात केले होते. अगदी तुटपुंज्या साधनांसह एके-47 च्या माऱ्याला थोपवलं. त्यांच्या या शौर्याचा गौरव राष्ट्रपती पदकाने करण्यात आला. माझा कट्ट्यावर सदानंद दाते यांनी 26/11 हल्ल्याच्या थरारक आठवणी जागवल्या. दहशतवाद्याशी दोन हात करताना आलेला थरारक अनुभव त्यांनी सांगितला.... 


अमेरिकेत जेव्हा 9/11 हल्ला झाला, त्यावेळी तसा हल्ला आपल्याकडे होईल, असा कुणी विचारही केला नव्हता. त्यामुळे आपली तशी तयारीही नव्हती. असं काही संकट येणार असेल तेव्हा आपण तयारी करतो. मात्र, या संकटाची कुणालाही कल्पना नव्हती. तयारी नसतानाही मुंबई पोलिसांनी अतिशय शौर्यानं सामना केला. तुकाराम ओंबळे यांनी फक्त लाठी घेऊन एके-47  असलेल्या दहशतवाद्याशी लढले. त्यांनी हातात कोणतेही शस्त्र नसताना कसाबला पकडलं. ओंबळे यांच्या कर्तुवामुळेच आपण कसाबला पकडू शकलो. 


26/11 चा हल्ला अन् कसाबला दिलेली फाशी इतकेच लोकांना दिसते. मात्र, त्यामध्ये झालेली दीड वर्षात ट्रायल लोकांना दिसत नाही. पण सुरक्षा यंत्रणेच्या रिपोर्ट्सनुसार, कसाबच्या ट्रायलवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे देशाचे गृहमंत्रीही मुंबईत येऊन गेले होते. तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सुरक्षेचा आढवा घेऊन,  ट्रायल होणारं ठिकाणच बॉम्ब प्रूफ करु असं सांगितलं. ट्रायल पुढे ढकलण्यात आली. यावेळी कधीही हल्ला होईल, कसाबला विष देऊन मारलं जाईल, वकिलाला मारलं जाईल, यासारखे रिपोर्ट्स येत होते. ट्रायलची सुरक्षा करणं सोपी नव्हतं. पण ती करणं महत्वाचंही होतं. पण 2008 ते 2012 या कालावधीत आंतरराष्ट्रीय समुदयासमोर भारत एक सक्षम लोकशाही आहे. कायद्याचं राज्य आहे. दहशतवाद्यालाही बचावाच्या संधी दिल्या, तो दोषी आढळल्यावर आम्ही त्याला फाशी दिली, हे सांगायचं होतं. पोलीस अधिकारी म्हणून हा खरंच समाधानाचा क्षण होता. 


त्या काळरात्रीचा सदानंद दाते यांचा अनुभव -
त्या दिवशी क्रिकेटचा सामना होता. सायंकाळी झोपायला जात असताना टीव्हीवर दक्षिण मुंबईत हल्ला झाल्याचं समजलं. त्याचवेळी माझे सहकारी एसीपी मराठे यांचा मला फोन आला. दक्षिण मुंबईत गोळीबार सुरु असल्याचं सांगितलं. त्यावेळी मी माझ्या उच्च अधिकाऱ्यांना फोन करुन दक्षिण मुंबईत जातो अथवा माझ्या कार्यक्षेतात नाकाबंदी लावतो, असं सांगितलं. घरुन निघाल्यानंतर मला सीएसटी स्टेशनला जाण्यास सांगितलं. त्यानंतर मी मलबार हिल पोसील स्टेशनला गेलो. कारण माझ्याकडे AK-47 नव्हती. पण मलबार हिल स्टेशनमध्येही AK-47 मिळाली नाही. माहिती घेत मी मेट्रोल सिमेना पर्यंत पोहचलो होते. तेव्हा मला सांगण्यात आलं की, जीटी लेनमध्ये गोळीबार सुरु असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी तिकडे जात असताना कामा हॉस्पीटलमध्ये गोळीबार सुरु असल्याचं सांगण्यात आलं. आम्ही सात जण कामा रुग्णालयात गेलो. इमारातीच्या समोरचं दोन मृतदेह पडले होते. चौथ्या मजल्यावर गोळीबार होत असल्याचं आम्हाला सांगितलं. त्याचवेळी आम्हाला टेरीसवर काही होत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. आम्ही तिकडे पोहचणार तेवढ्यात डोक्यात शंका आली. आपण न तपासता कसं जाणार. त्यामुळे सोबत असणाऱ्यांना कॉईन आहे का विचारलं. पण कुणाकडे कॉईन नव्हते. त्यामुळे पुन्हा सहाव्या मजल्यावर आलो. तिथे काम सुरु असल्यामुळे बऱ्याच मेटल क्लीप पडल्या होत्या. त्या घेतल्या अन् पुन्हा वरती गेलो. टेरेसच्या दारावर त्या क्लीप फेकल्या. कसाबला वाटलं की पोलिसांनी हँडग्रेड फेकला. त्यामुळे त्याने फायरिंग करायला सुरुवात केली. एके-47 ने कसाब फायरिंग करत होता. आमच्याकडे एके-47 नव्हती. त्यामुळे सामना कसा करायचा हा प्रश्न होता. आम्ही त्यांचा जायचा मार्ग ब्लॉक करायचा ठरवलं. खाली येऊन त्यांचा रस्ता ब्लॉक केला. कंट्रोल रुमला सर्व आम्ही सांगत होतोच. त्याचवेळी एक व्यक्ती वरुन खाली आला होता. त्यावेळी त्याला आम्ही थांबवलं. तो रुग्णालयातच काम करणारा होता. त्यावेळी त्या व्यक्तीला हात वरती करण्यास सांगितलं. तेव्हा त्या व्यक्तीने खुणवत त्याच्यामागे कुणीतरी असल्याचं सांगितलं. कसाब आणि त्याचा जोडीदार त्याला मोहरा बनवून जिन्यातून लपून खाली येत होते. त्या व्यक्तीच्या डोक्यावरुन फायरिंग केल्यानंतर दहशतवाद्याने पळ काढला. तो व्यक्ती आमच्याकडे आला. आम्ही त्याची विचारपूस केली. त्यानं सांगितलं की, वरती अनेक डॉक्टर, नर्स आणि लोकांना बंदी बनवलं आहे. त्या व्यक्तीकडे मोठ्या बंदूका आहेत. ते हिंदी आणि उर्दू बोलतात. विचारपूस सुरु असतानाच ग्रेनेड बॉम्ब आमच्यासमोर पडला. या बॉम्बचा आमच्यासमोर स्फोट झाला. त्यामुळे डोळ्यात अंधारी आली होती. त्याचवेळी आम्ही प्रत्युत्तरदाखल लगेच फायरिंग केली. आमच्यासोबत असणारे पोलीस अधिकारी मोरे यांचा मृत्यू झाला. तर इतर आम्ही सर्वजण जखमी झालो होतो. जखमी असल्यामुळे त्यांना फायरिंगही करता येत नव्हतं. त्याचवेळी आणखी एक ग्रेनेड बॉम्ब आमच्यासमोर पडला. त्यावेळी मी पुन्हा फायरिंग करत प्रत्युत्तर दिलं. पण जखमी झालेल्या इतरांना फायरिंग करता येत नव्हती. त्यावेळी त्यांना त्यांची शस्त्र इथं ठेवून खाली जाण्यास सांगितलं. तुम्ही उपचार घ्या इथं मी सांभाळतो. खाली गेल्यानंतर मला मदत पाठवा, असं मी त्यांना सांगितलं. रात्री अकरा वाजता कसाबसोबत आमची चकमक सुरु झाली. तो खाली येण्यासाठी ग्रेनेड बॉम्ब टाकायचा मी प्रत्युत्तरदाखल उत्तर द्यायचो. असं चार वेळा घडलं पण पाचवा ग्रेनेड बॉम्ब  माझ्या पायाजवळचं पडला अन् ब्लास्ट झाला. मला काही काळ समजलेच नाही. डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या होत्या. प्रत्युत्तर फायरिंगही करु शकलो नाही. काही वेळानंतर मला माझ्या डोळ्यासमोर हालचाल दिसली. त्यावेळी थोडं खाली आलो. त्यावेळी दोघेजण मला जाताना दिसत होते. तोपर्यंत माझ्याकडे असणाऱ्या सर्व शस्त्राच्या गोळ्या संपल्या होत्या. रिव्हॉल्वर माझ्याकडे फक्त तीन गोळ्या शिल्लक होत्या. त्यामधील दोन गोळ्या मी तात्काळ झाडल्या. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला. पण त्याचवेळी त्यांनी सहावा ग्रेनेड बॉम्ब माझ्या दिशेने फेकला. त्यांनी तिथून पळ काढल्यानंतर तात्काळ कंट्रोलमध्ये फोन करुन दोघांबाबत माहिती दिली. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी दोन्ही दहशतवादी खाली गेले. त्यावेळी सवा बाराच्या आसपास वॉकीटॉकीवर मोठ्या गोळीबाराचा आवाज आला. करकरेंच्या ताफ्यावर त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर स्कोडा कार घेऊन अतिरेकी निघाले. त्यानंतर साडेबाराच्या आसपास चौपाटीवर  कसाबला पकडल्याचं समजलं.