मुंबई : माझ्या डोक्यात नेहमीच कुस्ती असायची, महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली आणि आई-वडील आणि वस्तादाच्या कष्टाचं चीज झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने व्यक्त केली. महाराष्ट्र केसरी ही सुरुवात आहे, यापुढे आशियन खेळ आणि ऑलिम्पिक हेच लक्ष्य असल्याचं शिवराज म्हणाला. तो एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होता.
सिनिअर नॅशनल स्पर्धेच्या ट्रायलवेळी खांद्याला दुखापत झाली होती, परंतु तरीही शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा जिंकली. 2017 साली माझी महाराष्ट्र केसरीसाठीची तयारी चांगली झाली होती. पण त्यावेळी पहिल्याच कुस्तीत मला दुखापत झाली आणि स्पर्धेतून बाहेर पडलो. त्यानंतर दोन वर्षामध्ये, कोरोनामुळे मी यापासून दूर राहिलो. नंतरच्या काळात खांद्याला दुखापत झाली असं शिवराज राक्षे म्हणाला.
महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास
नेहमीच डोक्यात घरच्यांचं आणि वस्तादांचं स्वप्न होतं, ते पूर्ण केलं याचं समाधान आहे असं शिवराज राक्षे म्हणाला. आतापर्यंतचा कुस्तीचा प्रवास सांगताना शिवराज राक्षे म्हणाला की, "आजोबा आणि वडील चांगले पैलवान होते. त्यामुळे लहानपणापासूनच तालमीत गेलो. मी सहा-सात वर्षाचा असताना कुस्तीची सुरुवात केली. त्यावेळीपासून मेहनत केली आणि आता इथपर्यंत पोहोचलो. घरची परिस्थिती नाजूक आहे. केवळ एक एकर शेती स्वत:ची आहे, 10 एकर शेती खंडणीने करतोय. आई-वडील आणि बहिण-भाऊ घरची शेती आणि जनावरं पाहतात, कष्ट करतात."
असा करतो रोजचा व्यायाम
शिवराज राक्षे म्हणाला की, "चौदाव्या वर्षी मी कुस्तीच्या तयारीसाठी आळंदीच्या तालमीत गेलो. त्यानंतर काका पवारांच्या तालमीत गेलो. त्यावेळीपासून मेहनत घेतली. आता सकाळी रोज 800-900 जोर मारतो. त्यानंतर रनिंग करतो. हौद तोडणे, रस्सी चढणे आणि त्यानंतर नाश्ता आणि विश्रांती करतो. परत प्रॅक्टिस आणि नंतर जेवण करतो. संध्याकाळी वेट ट्रेनिंग करतो."
येत्या काळात आशियन खेळ आणि ऑलिम्पिक गेम्स असतील, त्यासाठी आता तयारी करणार असल्याचं शिवराज राक्षेनं सांगितलं. घरी जनावरं असल्यामुळे आई-वडील हे महाराष्ट्र केसरीची कुस्ती पाहण्यासाठी येऊ शकले नाहीत, त्यांनी घरातूनच टीव्हीवर कुस्ती पाहिल्याचं शिवराज राक्षेने सांगितलं. आई-वडिलांचा आनंद हा माझ्यासाठी सर्वात मोठा असल्याचं तो म्हणाला.
अवघ्या 55 सेकंदात कुस्ती कशी जिंकली या प्रश्नावर शिवराज राक्षे म्हणाला की, "प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र हा माझ्याच तालमीतला होता, त्यामुळे दोघांनाही एकमेकांचे डाव माहिती होते. माझी कुस्ती ही अटॅकिंग असते, सुरुवातीपासून मी आक्रमक होतो. त्यामुळेच महेंद्रला मी चितपट करु शकलो."
वस्तादांनी सांगितलं होतं की कुणीही जिंको, गदा ही आपल्याच तालमीत यायला हवी. त्यामुळे कुस्ती जिंकल्यानंतर आम्ही दोघंही एकत्र आलो असं शिवराज राक्षे म्हणाला.
प्रयत्न करत राहा, यश तुमचंच; शिवराजचा तरुणांना सल्ला
प्रत्येक गावामध्ये एक व्यायामशाळा काढली पाहिजे, त्यासाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला पाहिजे असं शिवराज राक्षे म्हणाला. प्रयत्न करत राहा, थोडा वेळ लागेल, यश नक्कीच मिळेल, संघर्ष करुनंच पुढे जायला लागतं. खेळाडूकडे सरकारने चांगल्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे, त्यामुळे खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल असं शिवराज म्हणाला. कुस्ती करायची झाली तर एका पैलवानाला महिन्याला सरासरी 50 ते 60 हजारांचा खर्च आहे असं शिवराज राक्षे म्हणाला.
आतापर्यंत फक्त 'भाग मिल्का भाग' आणि 'दंगल' चित्रपट पाहिले
आतापर्यंत केवळ 'भाग मिल्का भाग' आणि 'दंगल' हे दोनच चित्रपट पाहिल्याचं शिवराज राक्षेनं सांगितलं. कुस्तीपटूंचं स्ट्रगल काय आहे हे 'दंगल' या चित्रपटातून समजलं, तर 'भाग मिल्का भाग' या चित्रपटातून खेळाडूचा संघर्ष पाहायला मिळाला असं शिवराज राक्षे म्हणाला.
असा आहे शिवराजचा डाएट
तालमीत तयारी करताना आपण रोज बदाम रगडून गाळून तयार केलेली थंडाई घेतो. सोबत अंडी, चिकन, मटन,पालेभाज्या , दूध, तूप घेतो. हा डाएट रोज फॉलो करतो असं शिवराज राक्षे म्हणाला.
ही बातमी वाचा: