मुंबई: सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाडची उपांत्य लढत मी पाहिली नाही, त्यावेळी मी माझ्या कुस्तीची तयारी करत होतो असं महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2023) शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) म्हणाला. एक कुस्तीपटू म्हणून तुला सिकंदर शेखवर (Shivraj Rakshe) अन्याय झाला असं वाटतं का, चुकीच्या पद्धतीने गुण देण्यात आले का या प्रश्नावर शिवराज राक्षेने आपली प्रतिक्रिया दिली. नंतरही आपण यासंबंधिचा कोणताही व्हिडीओ पाहिला नाही असंही तो म्हणाला. शिवराज राक्षे एबीपी माझावर माझा कट्टा या कार्यक्रमात आला होता. 


महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेनंतर चर्चा असते ती अंतिम कुस्तीची, पण यंदा जास्त चर्चा झाली ती सिकंदर आणि महेंद्रच्या उपांत्य फेरीची. सिकंदरच्या विरोधात महेंद्रला चुकीच्या पद्धतीने चार पॉईंट्स दिल्यामुळे सिकंदर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावरुन आतापर्यंत अनेक वादही झाले. त्यावर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 


Shivraj Rakshe on Sikandar Shaikh: सिकंदर शेखच्या कुस्तीवर काय म्हणाला शिवराज राक्षे?


सिकंदरच्या कुस्तीवर बोलताना शिवराज म्हणाला की, सिकंदर आणि महेंद्रच्या कुस्तीनंतर माझी कुस्ती होती. त्यामुळे मी त्याची तयारी करत होतो.  म्हणून ती कुस्ती मी पाहू शकलो नाही. नंतर या कुस्तीचे व्हिडीओ पाहिले असतील तर त्यावेळी काय वाटले असा प्रश्न विचारला असता शिवराज राक्षे म्हणाला की, या कुस्तीनंतर मला एवढे कॉल आले, मेसेज आले पण मी तो व्हिडीओ पाहिलाच नाही. 


वादाला सुरुवात कशी झाली?


माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला होता. महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत 4 गुण मिळवत सिकंदर शेखवर 5-4 अशी आघाडी घेतली पण महेंद्र गायकवाडने लावलेला बाहेरील टांग हा डाव ही व्यवस्थित झाला नसल्याचा कुस्ती शौकिनांनी आरोप केला. महेंद्रला चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. सोशल मीडियावरून अजूनही याची चर्चा थांबलेली नाही.


प्रयत्न करत राहा, यश तुमचंच; शिवराजचा तरुणांना सल्ला 


प्रत्येक गावामध्ये एक व्यायामशाळा काढली पाहिजे, त्यासाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला पाहिजे असं शिवराज राक्षे म्हणाला. प्रयत्न करत राहा, थोडा वेळ लागेल, यश नक्कीच मिळेल, संघर्ष करुनंच पुढे जायला लागतं. खेळाडूकडे सरकारने चांगल्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे, त्यामुळे खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल असं शिवराज म्हणाला. कुस्ती करायची झाली तर एका पैलवानाला महिन्याला सरासरी 50 ते 60 हजारांचा खर्च आहे असं शिवराज राक्षे म्हणाला. 


आतापर्यंत फक्त 'भाग मिल्का भाग' आणि 'दंगल' चित्रपट पाहिले


आतापर्यंत केवळ 'भाग मिल्का भाग' आणि 'दंगल' हे दोनच चित्रपट पाहिल्याचं शिवराज राक्षेनं सांगितलं. कुस्तीपटूंचं स्ट्रगल काय आहे हे 'दंगल' या चित्रपटातून समजलं, तर 'भाग मिल्का भाग' या चित्रपटातून खेळाडूचा संघर्ष पाहायला मिळाला असं शिवराज राक्षे म्हणाला.