Majha Katta : देशातील सर्वाधिक चर्चेतल्या आंदोलनापैकी एक म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन. या आंदोलनाचा चेहरा म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर. शनिवारी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात मेधा पाटकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांच्याशी संवाद साधताना मागे स्क्रीनवर एक फोटो सातत्याने झळकत होता. त्यामध्ये मेधाताई आणि इतर कार्यकर्ते हे पोलीस लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या नर्मदा बचाव आंदोलकांना घेऊन जाताना दिसतात. हा फोटो ज्यांनी काढला ते फोटोग्राफर गजानन दुधलकरांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपल्या आठवणींना उजाळा दिला. 


गजानन दुधलकरांनी या फोटोसंबंधी आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. पोलीस गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आणि मेधा पाटकर आणि इतर सर्व आंदोलकांमध्ये अस्वस्थता पसरली. त्या विरोधात कार्यकर्त्यांनी धुळ्यामध्ये मोठं आंदोलन सुरु केलं. त्यावेळीही त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि शेकडो कार्यकर्ते जखमी झाले. त्या ठिकाणी गजानन दुधलकर हे एकमेव फोटोग्राफर होते. दुधाळकरांनी या घटनेचा त्यावेळी काढलेला फोटो हा नर्मदा बचाव आंदोलनाचा आणि संघर्षाचा महत्वाचा साक्षीदार ठरतोय. 


गजानन दुधलकर यांची इन्स्टाग्राम पोस्ट त्यांच्याच शब्दात... 
"एबीपी माझा वाहिनीच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात मेधा पाटकरांशी संवाद साधण्यात आला. त्या दरम्यान एक फोटो स्क्रीनवर झळकला, तो पाहिला आणि मी दोन दशकांहून अधिक काळ मागे गेलो. तो फोटो मी काढला होता आणि त्यावेळी तो अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या फ्रन्ट पेजवर झळकला होता. नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते रहिमल वेसावे हे पोलीस गोळीबारात मारले गेले, हा काळ सर्वसाधारणपणे 90 च्या दशकातील मध्यावधीचा असेल. त्यांच्या मृत्यूमुळे मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे शेकडो कार्यकर्ते अस्वस्थ झाले आणि त्यांना धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमकपणे आंदोलन सुरु केलं. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर हिंसक पद्धतीने लाठीचार्ज सुरु केला. मी त्यावेळी निखिल वागळेंच्या 'आपले महानगर' या वृत्तपत्रात काम करत होतो. महत्वाचं म्हणजे या आंदोलनाच्या ठिकाणी मी एकमेव फोटोग्राफर उपस्थित होतो. मी त्यावेळी काढलेला फोटो हा दुसऱ्या दिवशी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापून आला होता."


 






अन्यायग्रस्तांसाठी उठणारा जोरदार आवाज यामुळे मेधाताई देशातील कानाकोपऱ्यातील अन्यायग्रस्तांना त्यांच्या मसिहा वाटतात. मेधाताईंच्या आजच्या आयुष्यावर त्यांच्या लहानपणीचा खूप प्रभाव आहे. त्यांचे वडील वसंतराव खानोलकर मुंबईत कामगार सेनेत सक्रिय होते. देशातील विस्थापितांचा आवाज बनलेल्या आणि आदिवासी भागातील बांधवांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मेधा पाटकर यांचा आजवरचा प्रवास आणि वेगवेगळ्या आंदोलनांवेळी त्यांना आलेल्या अनुभवांवर यावेळी संवाद साधण्यात आला.


 



संबंधित बातम्या :