मुंबई : केंद्र आणि राज्याच्या संघर्षात माझा बळी गेला, अजूनही माझी न्यायालयीन लढाई संपली नाही. मात्र, मी आता गप्प बसणार नाही, असं सांगतायत शिवसेना प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक. मागील नोव्हेंबर महिन्यापासून ईडीच्या ससेमिऱ्यात ते अडकले आहेत. मधल्या काळात ते आऊट ऑफ रिच झाले होते. पण, यानंतर त्यांची सर्वप्रथम मुलाखत माझाने घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी ईडीच्या प्रकरणामुळे प्रचंड त्रास झाल्याचे मान्य केलेच. पण माझ्यामुळे माझ्या पत्नी आणि मुलांना जास्त त्रास झाल्याने मी व्यथित झालो असेही ते म्हणाले. तसेच किरीट सोमय्या यांनी आरोप करताना थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी होती, अशी टीका त्यांनी केलीय.


किरीट सोमय्या यांच्याबद्दल माझे खुप चांगले मत होते, आदर होता, पण माझ्यावर किरीट यांनी आरोप केले, त्यानंतर माझ्या 2 अँन्जोप्लास्टी झाल्या. अनेक प्रॉब्लेम आले. माझ्या घरच्यांवर अनेक संकटं आली. अशावेळी त्यांनी आरोप करणे थांबवले पाहिजे होते, पण ते मी प्रॉब्लेममध्ये बघून अजून आरोप करत राहिले, त्यांनी थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी होती, अशी भावना शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.


माझा कट्टा कार्यक्रमात येऊन भावना व्यक्त कराव्या वाटल्या : सरनाईक
या काळात एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात येऊन माझ्या भावना व्यक्त कराव्या, असे मला नेहमी वाटत होते. अजूनही माझी ईडीपासून सुटका झाली नाही. न्यायालयीन लढाई सुरूच राहील, पण सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं म्हणून मी आता बोलतोय. मात्र, काहीही न करता आरोप होत असून माझी छबी वाईट होत आहे. मी आधीपासून व्यावसायात आहे. बँक आता कर्ज देत नाही, माझे भागीदार घाबरतात, ग्राहक फ्लॅट विकत घ्यायला येत नाही, असे अनेक परिणाम यामुळे होत आहेत. राजकीय, व्यावसायिक आणि पर्सनल देखील, अशावेळी जवळचे मित्र लांब पळतात, लांबचे कधीतरी जवळ येतात, असे दिवस बघायला मिळतात. 


मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट झाल्यानंतर 9 जूनला मी पत्र लिहिले. भाजपसोबत जावे यावर, मी जे म्हणालो त्या माझ्या भावना होत्या. त्यानंतर खूप पाऊस पडून गेलाय. वादळे आली, आता ती गोष्ट संपली. माझी त्यानंतर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्राचा राजकारणाचा वारसा मोठा आहे, महाराष्ट्रची संस्कृती वेगळ्या वळणावर जात आहे, बाळसाहेबांचे देखील सर्वांसोबत वाद होते, पण जेव्हा महाराष्ट्राची गरज होती. तेव्हा सर्वजण एकत्र यायचे, आता देखील तीच संकृती पुढे ठेवावी.


प्रताप सरनाईक यांना बघून काही तरुण पुढे राजकारणात येणार असतील पण असे आरोप झाल्यानंतर ते का येतील? माझीच छबी अशी वाईट असेल तर, आपण युपी, बिहार यांची वाईट राजकारणाची उदाहरण देतो, पुढे जर महाराष्ट्राचे उदाहरण द्यायचे झाले तर तो महाराष्ट्राचा अपमान होईल, असे सरनाईक म्हणाले. 


राजकारणात काहीही शक्य : सरनाईक
केंद्र आणि राज्य संघर्ष थांबवा म्हणून मी पत्र लिहिले होते. पण आता तसे नाही, कोणाला वाटले होते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सेना जाईल? कोणाला वाटले होते असा कोणी मुख्यमंत्री होईल? पण जे स्वप्नात वाटलं नाही ते आता बघायला मिळतंय, त्यामुळे राजकारणात काहीही शक्य आहे. 


चर्चा होत राहतात, सर्व चर्चांना उत्तर देणे गरजेचे नाही. कुटुंब 24 तास सोबत असते. पत्नी, मुलं, सुना पाठीशी आहे. पण, आपल्यावर आलेलं संकट जेव्हा मुलांवर येत तेव्हा बाप आणि आई म्हणून खूप दुःख होतं. आपली प्रतिमा बघून त्या सुना लग्न करून आल्यात, पण अशी प्रतिमा डागळली तर त्यांना कसे वाटत असेल? असो कुटुंब प्रमुख म्हणून मी याला तोंड देईल, असे सरनाईक शेवटी म्हणाले.