Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbaj) यांनी बडवे आणि विठ्ठल यांची उपमा देत सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आणि पुन्हा एकदा बडवे आणि विठ्ठल राजकारणाच्या चर्चेत आले आहेत. छगन भुजबळ यांनी म्हटलं की, आमचे आमच्या विठ्ठलावर प्रेम आहे पण त्यांच्या भोवती बडव्यांच्या गराडा आहे त्यांना दूर करून आम्हाला आशीर्वाद द्या. यावर बडवे समाजाने देखील संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं की,'आम्ही कधीही आमच्या विठ्ठलाला सोडले नाही त्याच्यासोबत गद्दारी केली नाही मात्र तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी विठ्ठलाला सोडून त्याला त्रास देणाऱ्या माणसांबरोबर गेला आहात.'  


खरं तर याची सुरुवात राज ठाकरे यांनी केली होती. शिवसेना सोडताना राज ठाकरे यांनी अशाच पद्धतीचे विधान करीत बडव्यांवर आपला राग व्यक्त केले होता . त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे यांनी पत्रक काढून   उद्धव ठाकरे यांना शेजारच्या बडव्यांना दूर करण्याचे आवाहन केले होते. पण छगन भुजबळ यांनी ज्यांना बडवे म्हणून संबोधले त्यापैकी जयंत पाटील यांनी त्यांना लगेच उत्तर देखील दिले. 


बडवे समाजाकडून चोख उत्तर


वारंवार होत असलेल्या बडवे समाजाच्या बदनामीनंतर आज बडवे समाजानेही जशास तसे भाषेत सुनावत गद्दारी करणाऱ्या नेत्यांवर तोफ डागली आहे . आम्ही कधीही आमच्या विठ्ठलाला सोडले नाही त्याच्यासोबत गद्दारी केली नाही मात्र तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी विठ्ठलाला सोडून त्याला त्रास देणाऱ्या माणसांच्या सोबत बसल्याचा टोला श्रीकांत महाजन बडवे यांनी नेत्यांना लगावला आहे .


पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की,  'आम्ही शासनाच्या एका आदेशावर आमची शेकडो वर्षाची परंपरा , हक्क सोडून विठ्ठल मंदिरातून बाहेर पडलो.' पण आमच्या मनात आजही तोच विठ्ठल आहे. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही गद्दारी करणार आणि मग आम्हाला का बदनाम करता असा सवाल त्यांनी विचारला आहे.  तर 'शासनाच्या आदेशामुळे विठ्ठलाने जरी आम्हाला सोडले असले तरी आजही आमचे कुलदैवत विठ्ठल असून पुढच्या पिढ्यानपिढ्या कायम विठ्ठलाची सेवा करत राहू', असे विठ्ठल बडवे यांनी म्हटलं आहे. 


राजकीय नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे आमचे कुटुंबिय व्यथित होतात, तसेच आम्ही ब्राह्मण समाजाचे असल्याने आमच्यावर सतत असे आरोप केले जात असल्याचं नकुल बडवे यांनी म्हटलं आहे. तर राजकीय मंडळींनी अशा एखाद्या समाजाला लक्ष करणे बंद करावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. परंतु वारंवार होणाऱ्या या अपमानामुळे पहिल्यांदाच बडवे समाजाने देखील चोख उत्तर दिले आहे. पण या बडवे आणि विठ्ठलाचं नेमकं नातं काय हा प्रश्न मात्र कायमच उपस्थित होतो. 


  नेमका का केला जातो बडवे आणि विठ्ठलाचा उल्लेख ?


 देव दर्शनाला गेल्यावर भाविकांना त्रास होतो अशी ओरड सुरु झाल्यावर शासनाने 1970 साली विधानसभेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती 1073 असा कायदा केला होता. त्यानंतर त्यांची न्यायालयीन लढाई सुरु झाली. यानंतर 1985 साली मंदिराच्या व्यवस्थापनासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार एक व्यवस्थापन पाहण्यासाठी मंदिर समिती नियुक्ती करण्यास सुरुवात झाली . ज्यामध्ये बडवे आणि उत्पात यांच्या एक एक सदस्याचा समावेश होत होता . नंतर सर्वोच्य न्यायालयाने 14 जानेवारी 2014 साली मंदिराचा संपूर्ण ताबा शासनाकडे दिल्यानंतर बडवे आणि विठ्ठलाचं मंदिरातील नाते संपले .


तसे पहिले तर बडवे नेमके कधीपासून इथे आहेत याचे उत्तर अजूनही शोधात आलेले नाही . संत चोखामेळा यांच्या अभंगात देखील 'बडवा मज मारिती' अशा पद्धतीचा एक अभंग देखील प्रसिद्ध आहे . बडवे हे तेंव्हापासून चर्चेत असावेत आणि म्हणूनच आजही त्यांच्या नावाचा उल्लेख राजकीय साठमारीत देखील अशा पद्धतीने करण्यात येत असल्याचं म्हटलं जातं.  दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींना आमरण उपोषण येथेच करावे लागले होते. त्यानंतर शेवटी बडव्यांनी दलित समाजासाठी खुले केले होते.  अशा अनेक गोष्टींमधून बडव्यांची नकारात्मक बाजू समोर येत गेली. 


काय आहे बडव्यांचा इतिहास ?


बडवे नेमके कधीपासून इथे आहेत याचे उत्तर अजूनही शोधात आलेले नाही. 'आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी ..' असे वर्णन संतांच्या अभंगात सापडते. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांच्या आधीच्या पिढ्याही विठ्ठलाची भक्ती करत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे बडवे समाज देखील शेकडो वर्षांपासून विठ्ठलाच्या शेजारी असल्याचे सांगितले जाते .


 बडवे समाजाचे शामराज , सानबा , मल्हार आणि तिमण हे चार मूळ पुरुष मानले जातात . यांच्याच पिढ्या पुढे वाढत गेल्या आहेत . बडवे समाजात प्रल्हाद महाराज बडवे हे संत होऊन गेले. त्यांचे नातू अनंत महाराज हे पेशवे काळात तुळशीबागेत भागवत सांगायचे. बडव्यांच्या त्यागातून विठ्ठल मूर्ती आणि मंदिराचे संरक्षण झाल्याचे देखील सांगितले जाते. तर तेराव्या शतकातील बहामनी सुल्तानापासून ते सतराव्या शतकातील अफजलखान , औरंगजेब यांनी मंदिर फोडण्यासाठी केलेल्या हल्ल्यात बडव्यांनी मूर्तीचे संरक्षण केल्याचे सांगितले जातात.  याही सुलतानी संकटात विठूरायाची मूर्ती लपवली मात्र मंदिर बंद ठेवले नव्हते. 


परंतु बडव्यांना विठ्ठल मंदिरात येण्यास बंदी घातल्याच्या घटनेला जवळपास 10 वर्ष होऊन गेली आहेत. आता बडव्यांच्या विठ्ठल मंदिराशी कसलाही संबंध नसला तरी अजूनही विठ्ठलाला बडव्यांच्या गराडा असे सांगत वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी असल्याचे वक्तव्ये राजकीय नेते करत आहेत .


हे ही वाचा : 


Eknath Shinde: माझ्या मागे मोदी-शाहांची शक्ती, सरकार पडणार या निव्वळ अफवा; राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण