मुंबई : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुख्य म्हणजे भाविकांच्या वाढत्या आकड्यामुळं मंदिराला येणाऱ्या देणगीतही मोठ्या प्रमाणता भर पडत असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊन काळापुरतं मंदिर बंद ठेवल्यानंतर पुन्हा एकदा शिर्डीच्या दिशेनं भाविकांरी रिघ सुरु झाली आहे. सोबतच पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे ती म्हणजे सढळ हस्ते दिल्या जाणाऱ्या देणगीला.
साईबाबांच्या चरणी श्रद्धासुमनं अर्पण करतेवेळी अनेक भाविक बहुविध प्रकारचं दान मंदिर न्यास समितीकडे सुपूर्त करतात. सोनं- चांदीच्या वस्तू, पैसे, परदेशी चलनं अशा अनेक वस्तूंचा समावेश या देणगीमध्ये असतो. अनेकदा भक्तांकडून देण्यात आलेल्या या देणगीही सर्वांचं लक्ष वेधतात. कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय ठरतात.
सध्याच्या घडीला अशीच देणगी दिली आहे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या उद्योगसमूहानं. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्या वतीनं तब्बल ०८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची थार (Thar) या श्रेणीतील गाडी देणगी स्वरुपात दिली. याप्रसंगी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकारा यांनी संस्थानचे प्रमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सदर गाडीची चावी सुपूर्त केली.
राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या; 'ते तिथं गेले आणि....'
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्या वतीने यापूर्वी व्हायोजर, बोलेरो, स्कॉर्पिओ, कॅम्पर, लोगान, झायलो, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्टर), एक्स यु व्ही ५००, एक्स यु व्ही ३००, मराझो अशा विविध श्रेणीतील एकुण १४ वाहने देणगी स्वरुपात दिलेल्या आहेत. ज्यामागोमाग आता यात थारचाही समावेश झाला आहे.