मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच या राजकीय वर्तुळातील अनोख्या अंदाजामुळं चर्चेत असतात. कधी ते कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून येतात, कधी जनता दरबारात आलेल्या प्रत्येकाची भेट घेतात तर कधी पत्रकारांशी गप्पाही मारतात. अशा या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अजित पवार यांचा असाच एक अंदाज नुकताच पाहायला मिळाला. कारण, अजितदादांनी त्यांच्याच शैलीत राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या लोकांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. इंदापूर येथे झालेल्या सभेत त्यांनी पक्षाला रामराम ठोकणाऱ्यांचा मिश्कील अंदाजात समाचार घेतला.


लक्षवेधी पोस्ट लिहित लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम

'काहीजणांना सवय असते. ज्यांची सत्ता त्यांच्याकडे ते पळतात. पण, पक्षातून ते गेल्यामुळं त्यांचं सरकार गेलं आणि आमचं आलं. त्यामुळं असं जित्राबं नकोच', असं ते म्हणाले. सभास्थळी उपस्थित असणाऱ्यांना उद्देशून येत्या काळात आपण तरुणांची टीम तयार करु, फक्त निर्व्यसनी राहा चांगली कामं करा असा संदेशही त्यांनी दिला.

अजित पवार पक्ष सोडून गेलेल्यांना काय म्हणाले?

'सत्ता आहे, काहीजण तिकडंच पळालीत. त्यांचा पायगुण असा, की त्यांची सत्ताच गेली आणि आमची सत्ता आली. आता असली जित्राबं नकोच आपल्याला. यांनी कितीही होय म्हणू द्या मी नाहीच घ्यायचं म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका. नाहीतर तुम्ही, तुम कुश्ती करो हम कपडे संभालते है..! असं नाही झालं पाहिजे. आता आपल्याला नवीन टीम तयार करायची आहे. मला पण राजकारणात ३० वर्षे झालीत. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टिम होती. आताही आपण तरुणांची टीम तयार करु. तुम्ही काहीही काळजी करु नका'. अजित पवार यांची ही शाब्दिक फटकेबाजी उपस्थितांची चांगलीच दाद मिळवून गेली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पेट्रोल डिझेलच्या दरांवरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. 'केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल 100 रुपये लिटर झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नये. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार', असं ते म्हणाले होते. राजकीय वर्तुळात याचीही बरीच चर्चा झाली.