Mahayuti In Maharashtra : विदर्भातील पाच जागांसाठी प्रचार तोफा आज थंडावल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी प्रत्यक्षात सुरु होणार आहे. उद्या (18 एप्रिल) महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या आणि पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगलेल्या बारामती, महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बंडाळीमुळे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या सांगली आणि उमेदवारी निश्चित असून सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेमध्ये राहिलेल्या सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे महायुतीकडून या तिन्ही मतदारसंघांत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले जाणार आहेत. 


बारामती लोकसभेला शरद पवार विरुद्ध अजित पवार थेट संघर्ष


बारामती लोकसभेला शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट संघर्ष असणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये शक्तीप्रदर्शन करून महायुतीकडून संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी सुद्धा चर्चा आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी कट्टर विरोधकांच्या भेटीगाठी घेत जोडण्या सुरू केल्या आहेत. 


दुसरीकडे, अजित पवार यांनी सुद्धा आज बारामतीमध्ये दौरे करत लोकसभा निवडणुकीसाठी जोडण्या करण्याचा प्रयत्न केला. ज्याठिकाणी शरद पवारांकडून भेटीगाठी करण्यात आल्या त्या ठिकाणी सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांनी इंदापूरमध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांच्या घरी स्नेहेभोजनासाठी जाणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अत्यंत शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केला जाणार यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. 


सांगली, सातारमध्ये अर्ज दाखल 


सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे सुद्धा ही जागा राज्यामध्ये चांगली लक्षवेधी ठरली आहे. या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरघोडी सुरू आहे का? अशी सुद्धा स्थिती आहे. या जागेवर काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे, तर आघाडीचे ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील अधिकृत उमेदवार आहेत. मात्र चंद्रहार पाटील यांना सांगलीत काँग्रेसकडून विरोध होत आहे. भाजपला रामराम केलेल्या माजी दोन आमदारांनी सुद्धा विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सांगलीमध्ये संजय पाटील यांचा सुद्धा शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. 


सातारमध्ये कोणत्याही परिस्थितीत उदयनराजे भोसले यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, त्यांना आतापर्यंत उमेदवारी देण्यात न आल्याने सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या गेल्या. मात्र, अखेर त्यांची उमेदवारी काल घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या (18 एप्रिल) सातारमध्ये उदयनराजे भोसले यांचा भाजपकडून अर्ज दाखल केला जाणार आहे. या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला होता. मात्र, भाजपने आपल्या पदरात जागा पाडून घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या