मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील युवकांनीही बाजी मारली असून सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे व पालकांचे स्वप्न साकार झाले आहे. उत्तर प्रदेशच्या आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक मिळवला असला तरी राज्यातील ४ युवकांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्रातून कुश मोटवानी याने 11 वी रँक मिळवली असून समीर खोडे देशात 42 वा आहे. नेहा राजपूत 51 तर अनिकेत हिरडेने 81 वी रँक घेऊन केंद्रात मराठी पताका फडकवला आहे. त्यापैकी, समीर खोडे हा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतही झळकला होता. 


शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्या समीरने दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात 24 वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर, बारावीला 14 वा क्रमांक पटकावत बोर्डात येण्याची परंपरा कायम ठेवली. आता, युपीएससी परीक्षेतही देशात 42 वा क्रमांक पटकावत आयएएस अधिकारी होण्याचा सन्मान उत्तीर्ण केला आहे. नागपूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर समीरने व्हीएनआयटी कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर आयआयएम लखनौ येथे एमबीए पूर्ण करुन काही वर्षे परदेशातील खासगी कंपनीतही काम केले. मात्र, विदेशातील मोठ्या पगाराच्या नोकरीतही समीरचं मन रमले नाही. त्यामुळे, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने देशवापसी केली अन् युपीएससी परीक्षेतून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. समीरने 2019 मध्ये यूपीएससी परीक्षेत 551 वी रँक मिळवून भारतीय रेल्वे सेवेत नोकरी मिळवली होती. आता, पुन्हा 2023 मध्ये घवघवीत यश मिळवून समीर खोडे आता आयएएस होणार आहेत.


स्पर्धा परीक्षा म्हणजे यश मिळवण्यासाठीचा जुगार असल्याचंही अनेकदा बोललं जातं. मात्र, जो कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने तयारी करतो, त्यास यश मिळतेच अशी अनेक उदाहरणे युपीएससी परीक्षेच्या निकाल यादीतून बाहेर येतात. यशाला शॉर्टकर्ट नाही म्हणतात तेही तितकेच खरे आहे. कारण, युपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी मोठी कष्टाची तयारी व संयम हवाच हेही उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीतून लक्षात येते.


कुश मोटवानी राज्यात पहिला, समीर खोडे दुसरा 


केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. मुंबईचा कुश मोटवानी देशातील 11 व्या रँकसह महाराष्ट्रात पहिला असून समीर प्रकाश खोडे दुसरा आहे, देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे.  


37 दिव्यांग उमेदवारांनीही पटकावले यश


केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 2023-2024 दरम्यान घेण्यात आलेल्या परिक्षेत एकूण 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यामध्ये, 37 दिव्यांग उमेदवारांचा देखील समावेश आहे. यात खुल्या (ओपन) प्रवर्गातून 347, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 86 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37 दिव्यांग उमेदवार आहेत.