Mahayuti Dispute : एकीकडे महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे चित्र असतानाच, दुसरीकडे महायुतीमधील नेत्यांमध्ये सुद्धा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेते (BJP Leader) आणि शिंदेसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यातील वाद आता टोकाला पोहचले आहेत. तसेच, खेडचे पार्सल बोरीवलीत पाठवायला वेळ लागणार नाही असे म्हणत भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी रामदास कदमांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे दापोलीत महायुतीमध्ये संघर्ष आणखीनच पेटण्याची चिन्हे दिसत आहे. 


दापोलीमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या नेत्यांनी शिवसेना (शिंदेगट) नेते रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केल्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या या दोन पक्षात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस सातत्याने भाजपविरोधात बोलणाऱ्या आणि भाजपवर आरोप करणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांना भाजपने दापोलीत झालेल्या मेळाव्यात रोखठोक इशारा दिला आहे. भाजपला डिवचायचा प्रयत्न केलात, तर आम्ही दापोलीवाले आहोत. विधानसभेच्या निवडणुका देखील काही महिन्यांवर आहेत. याद राखा हे खेडचं पार्सल बोरिवलीत पाठवायला वेळ लागणार नाही असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे नेते सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना दिला आहे.


रामदास कदमांच्या विरोधात भाजप नेत्यांमध्ये रोष...


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपसोबत युतीत असलेल्या शिंदेसेनेत रामदास कदम सध्या आहेत. पण असे असतानाच भाजप आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय युद्ध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत भाजपवर टीका करणाऱ्या रामदास कदम यांच्याविरोधात भाजप नेत्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. आता तर हा वाद टोकाला पोहचला असून, भाजप नेत्यांकडून थेट कदम यांना इशारा देण्यात येत आहे. भाजप विरोधात वक्तव्य केल्यास खेडचं पार्सल बोरिवलीत पाठवायला वेळ लागणार नाही असेही थेट भाजप नेत्यांनी कदम यांना इशारा दिला आहे. 


भाजपमुळे माझ्या मुलाचा पराभव : रामदास कदम


एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांकडून युती धर्म पाळण्यात आला नाही. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला मतदान करून माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. रामदास कदम यांच्या याच वक्तव्यावरून दापोली मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील कदम यांनी भाजप नेते तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष केले होते. तसेच, 'कोण तो रवींद्र चव्हाण'? असा एकेरी उल्लेख देखील कदम यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून भाजप पदाधिकारी विरुद्ध रामदास कदम असा वाद दापोलीत पाहायला मिळतोय.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Lok Sabha Election 2024 : तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला कात्रजचा घाट दाखवला; रामदास कदमांच्या टीकेला विनय नातूंचं सणसणीत उत्तर