पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून)  पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता देणार की निर्बंध कठोर केले जाणार याकडे लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर पुणेकरांना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळाली आहे.


जवळपास दोन महिन्यांनी पुण महापालिका क्षेत्रातील मॉल तसंच अभ्यासिका आणि वाचनालयं सुरु होणार आहेत. अभ्यासिका आणि वाचनालयं पुन्हा सुरु होणार असल्यामुळे प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिकृत परिपत्रक अद्याप जारी झालेलं नसलं तरी पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे, असं शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं. "पुणे महापालिका क्षेत्रातील मॉल खुले होणार आहेत. सर्व दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. तर अभ्यासिका आणि वाचनालयं देखील 50 टक्के क्षमतेने खुली राहू शकतील," असं त्यांनी सांगितलं. 


दरम्यान पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला प्रशासन लगेच निर्बंध बदलेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं.


सध्या दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता इतर दुकानं सुरु करण्यास मनाई आहे.