कोल्हापूर : समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सर्व राजकीय नेत्यांना केलं आहे. मराठा आरक्षणासंबंधी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीपासून मुक मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींनी हे आवाहन केलं आहे.
संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते लिहितात की, ही वादळापू्र्वीची शांतता आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा. कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचा फोटोही या पोस्टमध्ये शेअर करण्यात आला आहे.
येत्या 16 तारखेपासून कोल्हापुरातून सुरु होत असलेल्या मराठा आरक्षणाच्या या आंदोलनावरुन आता महाराष्ट्रातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बैठकांचं सत्र सुरु झाल्याचं दिसून येतंय. गुरुवारी या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी कोल्हापुरात संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली मराठा समन्वयक समितीची बैठक झाली.
मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. आपल्याला आता कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. कलम 338 बी मधून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
ही वादळापूर्वीची शांतता
आपली लढाई ही मराठा समाजातील 70 टक्के गरीबांसाठी असून समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरुन जाहीर केलं होतं. समाजातील नेते हे मतांसाठी तेवढं समाजाकडे येतात, आरक्षणाच्या मुद्द्यावर मात्र गप्प बसतात अशीही टीका त्यांनी याआधी केली आहे. व्होट बँकेचं राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आता बोलावं आणि आपली जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये 'ही वादळापूर्वीची शांतता आहे' असं म्हटलं आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे 16 जूनच्या आंदोलनानंतर स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; संभाजीराजेंचा इशारा
- मराठा आरक्षणावर पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी : संभाजीराजे छत्रपती
- Pandharpur Ashadi Wari 2021 : आषाढी वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी, यंदाही पायी वारी सोहळा नाही : अजित पवार