उस्मानाबाद : महावितरणने आज वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासंदर्भात वीज नियामक आयोगासमोर वीज दरवाढीचा सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही दरवाढ यावर्षी एप्रिल महिन्यापासून लागू करायची आहे. वाढीव दर 2025 पर्यंत कायम असतील. या पाच वर्षांमध्ये मिळून ग्राहकांकडून महावितरणला 60 हजार 313 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. दरवर्षी ही दरवाढ वाढत जाणार आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी मिळून सरासरी 5.80 टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे. या संभावित दरवाढीतून महावितरणला यावर्षी 5 हजार 928 कोटी मिळणे अपेक्षित आहे.


दरवर्षी वीजदरामध्ये केली जाणारी वाढ (टक्क्यांमध्ये)
2020-21 : 5.80 टक्के
2021-22 : 3.25 टक्के
2022-23 : 2.93 टक्के
2023-24 : 2.61 टक्के
2024-25 : 2.54 टक्के


महावितरणला गेल्या तीन वर्षांमध्ये मिळून 8 हजार 754 कोटींचा तोटा झाला आहे. यापूर्वी वीज नियामक मंडळाने 12 हजार 382 कोटींची दरवाढ मंजूर केली होती. ही दरवाढदेखील पुढच्या पाच वर्षात वसूल केली जाणार आहे.


घरगुती ग्राहकांच्या स्थिर आकारांमध्ये दरवाढीचा प्रस्ताव आहे. तर औद्योगिक वापरासाठी सरसकट एक टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. दोनशे युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. तर दोनशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना फायदा होणार आहे.


कमी वीज वापरणाऱ्यांना तोटा, जास्त वीज वापरणाऱ्यांना फायदा
200 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी 6.10 ₹ प्रतियुनिट असा दर होता. त्यामध्ये वाढ करुन आता 7.90. ₹ प्रतियुनिट असा दर असेल. 200 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी 9.25 ₹ प्रतियुनिट असा दर होता. त्यामध्ये कपात करुन आता 7.90. ₹ प्रतियुनिट असा दर ठेवण्यात आला आहे.