Ashish Shelar : भाजपतर्फे सध्या पोलखोल कार्यक्रम करण्यात येत आहे. या पोलखोलच्या माध्यमातून नवनवीन रूप आम्ही समोर आणत आहोत, मुंबईत सरकारी जागांची लयलूट कशी होते. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या जागांवर भ्रष्टाचाराचे प्रकार कसे वाढत आहे? मुंबईतील सरकारी जागा कवडीमोल किंमतीला देण्याचा हा प्रकार सुरू आहे, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले, आज शेलारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आणखी काय म्हणाले शेलार?


'ती' जागा खासगी विकासकाला विकण्याचा घाट, कुठल्या मंत्र्याशी लागेबांधे?
आशिष शेलार म्हणाले,  जे बांधकाम सरकारी जागेवर आहे, अशा जागा विकल्या जात आहेत. मुंबईत वांद्रे पश्चिम विभागात बँड स्टँड जवळ उच्च प्रतीच्या आणि उच्च दराच्या जागा असलेल्या ताज हॉटेलच्या बाजूला 1 एकर पाच गुंठे जागा राज्य सरकारची जागा लीज वर आहे, ती जागा महसूल खाते अंतर्गत होती, ही जागा एका चॅरिटेबल ट्रस्टला दिली होती, ज्या ट्रस्टची लीज 1980 ला मोक्याची जागा त्यावेळी सरकारने आजारी पडलेल्या लोकांना विश्रातीसाठी दिली होती, ती जागा रुस्तमजी नावाच्या खासगी विकासकाला विकण्याचा घाट घातला गेला आणि ती विकलीही गेली. रुस्तमजीला 1 हजार 3 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. 234 कोटी रुपयात विकण्याच्या सर्व परवानग्या त्या ट्रस्टला दिल्या गेल्यात, यामुळे प्रश्न निर्माण होतो की कुठल्या मंत्र्याशी याचे लागेबांधे आहेत? असा सवाल देखील शेलारांनी यावेळी केला आहे. 


...तर सरकारला त्याचा फायदा झाला असता


आशिष शेलार म्हणाले, मुंबईत वांद्रे भागात असलेली ही जागा विकण्याची परवानगी देताच कामा नये. जी जागा सरकारची स्वतःची होती, ती जागा ट्रस्टला विकण्याची परवानगी देण्यात आली. हे सर्व प्रकरण संशयित वाटावे अशी चर्चा आहे. वर्ग दोन नुसार ही जागा दिली असती तर सरकारला त्याचा फायदा झाला असता, मुंबई महानगर पालिकेने या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मान्य करू नये, तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी शेलारांनी केली आहे. 


याचा मास्टर माईंड 6 व्या माळ्यावरचा - आशिष शेलार


सरकारी जागा कवडीमोल विकली जात असताना ठाकरे सरकार मूग गिळून गप्प का बसले? 6 व्या मजल्यावरच्या मंत्रालयात कोण हे धंदे करत आहे? यामागे राजकीय धंदे आहेत, तसेच याचा मास्टर माईंड 6 व्या माळ्यावरचा आहे असे आरोप करत शेलारांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे.