परभणी : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आजपासून आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत बस सेवा 31 मार्चपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे. रोज साधारणतः जिल्ह्यातून 800 ते 900 बस फेऱ्या होत असतात त्या बंद झाल्या असल्याने एसटी महामंडळाला रोज 30 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याशिवाय हॉटेल्स, रेस्टारंट, चहा ठेले, पानपट्टी धारक यांनाही आपली प्रतिष्ठाणं बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. एकूणच वाढत्या संसर्गाने जिल्ह्यातील निर्बंध हे अधिकपणे कडक करण्यात आले आहेत.


वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे प्रशासन गंभीर 
परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने कडक पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर 18 मार्चला एसटी बसला तब्बल एक लाख रुपयांचा दंड केला होता.


परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा बसची चाक थांबली आहेत. आजपासुन 31 मार्चपर्यंत बस सेवा पुर्णतः बंद करण्यात आली आहे.


काय होती घटना?
लातुर-जिंतुर ही (MH 20 BL 1922) क्रमांकाची बस जिंतुरकडे येत असताना या बसची तपासणी परभणी-जालना-जिंतुर रस्त्यावरील सप्तगिरी हॉटेलसमोर उभी करून जिंतुरचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे व नगर परिषद जिंतुरचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने या बसची तपासणी केली असता या बसची आसन व्यवस्था ही 44 जागांची असताना तब्बल 81 प्रवासी बसवलेले होते. महत्त्वाचे म्हणजे एक कुत्र्याचे पिल्लूही बसमध्ये प्रवास करत होते. त्यातच प्रवाशांच्या तोंडाला ना मास्क होते ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्सिंग यामुळे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी 20 फेब्रुवारी रोजी काढलेल्या वाहन क्षमतेपेक्षा आत प्रवासी संख्या घेऊन जाण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले. शिवाय कोरोना संसर्ग वाढेल असे कृत्य करून निष्काळजीपणा केल्याने जिंतुर आगार व्यवस्थापकांना तब्बल 1 लाखांचा दंड ठोठावलाय. महत्त्वाचे म्हणजे 22 मार्चपर्यंत हा दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकारी उमाकांत पारधी यांनी काढले आहेत.