End of Farmers Protest : केंद्र सरकारने विविध मुद्यांवर सहमती दर्शविल्यानंतर शेतकरी संघटनांनी 378 दिवसांनंतर ऐतिहासिक शेतकरी आंदोलन (Farmers Protest) स्थगित केलं. यासोबतच गेल्या एक वर्षाहून अधिक काळ आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हा आपला विजय मानला. सध्या राजधानीच्या सीमांवर शेतकरी आनंदोत्सव साजरा करत आहेत.


दिल्लीतील गाजीपूर बॉर्डरवर काल (गुरुवारी) आंदोलक शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. आंदोलन स्थगित झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला. यावेळी अनेक शेतकरी आपल्या सामानाची बांधाबांध करताना दिसले. शेतकरी म्हणाले की, या निर्णयामुळे ते खूप खूश आहेत आणि आता आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत आहेत. 


शेतकरी आंदोलन संपलं नाही, तर स्थगित झालंय 


आंदोलन स्थगित केल्याच्या अधिकृत घोषणेनंतर शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल म्हणाले की, अहंकारी सरकारला नमवलंय. ते म्हणाले की, आंदोलन संपलं नाही, स्थगित झालंय. मोर्चे संपत आहेत. सर्व शेतकरी 11 डिसेंबरला घरी परततील. राजेवाल म्हणाले की, संयुक्त किसान मार्चा अखंड राहील. दर महिन्याच्या 15 तारखेला बैठक असेल. शेतकरी मुद्द्यांवर आंदोलन सुरुच राहील. तसेच निवडणुकीसंदर्भात विचारल्यावर संयुक्त किसान मोर्चा निवडणूक लढवणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 


स्वातंत्र्यानंतरचं देशातील सर्वात मोठं आंदोलन


शेतकरी नेते हन्नान मोल्लाह म्हणाले की, "हे आंदोलन स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं आंदोलन आहे. आम्हाला आनंद होत आहे की, अखेर सरकारला सत्यासमोर माघार घ्यावीच लागली. पुढे बोलताना ते म्हणाले की, हे सर्वात शांतीपूर्ण आंदोलन होतं. तसेच एमएसपी हमी कायदा लागू होईपर्यंत दर महिन्याला बैठक घेण्याचे किसान मोर्चाने जाहीर केलं आहे. 15 जानेवारीला पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र सरकारनं आश्वासनांची पूर्तता न केल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारही देण्यात आला आहे. 


पाहा व्हिडीओ : शेतकरी आंदोलनाबाबत अखेर मोठी घोषणा



बळीराजाचा निर्धार, सरकारची माघार 


ऐन हिवाळ्यात नोव्हेंबरमध्ये बळीराजानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. दिल्लीत कडाक्याची थंडी होती. त्या थंडीतही बळीराजाचा निर्धार काही कमी झाला नाही. कडाक्याच्या थंडीत, रखरखत्या उन्हाळ्यात आणि कोसळणाऱ्या पावसातही बळीराजा देशाच्या राजधानीच्या सीमांवर आपल्या हक्कांसाठी लढा देत होता. 


शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. अनेक हॉलिवूड कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. देशातही या आंदोलनामुळं अनेक घटना घडल्या. अखेर बळीराजासमोर सरकार झुकलं अन् पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. पण जोपर्यंत कायदे घटनात्मक पद्धतीनं रद्द होत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचा स्पष्ट मत शेतकऱ्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही कृषी कायदे मागे घेण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक पारित झालं आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे कायदे घटनात्मकरित्या रद्द झाले. अन् शेतकऱ्यांचा लढा खऱ्या अर्थानं यशस्वी झाला. 


देशाच्या राजधानीच्या शहराला वेढा देऊन इतक्या मोठ्या कालावधीसाठी सुरु राहिलेलं हे इतिहासातलं पहिलंच आंदोलन. याआधी 80 च्या दशकात शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांनी हजारो शेतकऱ्यांसह इंडिया गेटवर बैलगाडी मोर्चा आणला होता. पण ते आंदोलन एक आठवडाभर चाललं होतं. एका आठवड्यातच राजीव गांधी सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या. पण आता याच महेंद्रसिंह टिकैत यांचे पुत्र राकेश टिकैत यांनी सरकारसोबत तब्बल वर्षभराहून अधिक काळ टक्कर दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा