Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सोहळे सुरु झाले आहेत. शरद पवार यांचा उद्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांच्या 'नेमकचि बोलणे' पुस्तकाचं प्रकाशन झालं. शरद पवारांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. 


या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांच्या भाषणांचा काही भाग वाचण्यात आला. त्यानंतर त्या त्या वेळी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अभिनेता, कवी किशोर कदम यांनीही पवारांच्याबद्दलचा किस्सा सांगितला. त्यानंतर किशोर कदम यांनी सर्वांना पडणारा प्रश्न शरद पवारांना विचारला. तो प्रश्न होता, शरद पवार सर्वांना नावानिशी कसे ओळखतात?


आम्ही नट असून पाठांतरात कमी


यावेळी किशोर कदम म्हणाले, आम्ही नट असून पाठांतरात कमी पडतो, तुम्ही नावं कशी लक्षात ठेवता? त्यावर शरद पवांनी भन्नाट गोष्ट सांगितली. शरद पवार म्हणाले, "राजकारणात फार कमी कष्टानं आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळतं, फक्त तुम्ही समोरच्या माणसाचं नाव लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातली होती. तिचं काहीतरी काम होतं. मी तिला म्हटलं, काय गं कुसूम मुंबईला कशी, काय चाललंय? तर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली काम होवो न होवो, अशी तिची भावना होती. लोकांचं खूप छोट्या गोष्टीत सुख असतं. या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील. या दोघांनाही कितीही जुना माणूस भेटला तरी ते नाव लक्षात ठेवायचे. या गुणामुळं समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त व्हायचं यश मिळतं, असंही पवार म्हणाले.


पाहा व्हिडिओ: शरद पवारांनी सांगितला नावं लक्षात ठेवण्याचा भन्नाट किस्सा!


 



अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी शरद पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'नेमकचि बोलणें' या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार उपस्थित होते. त्यांच्याशिवाय, शिवसेना खासदार संजय राऊत, रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाईन उपस्थित होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,  राज्याचे मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे आदी सभागृहात उपस्थित होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: