मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून महाराष्ट्रात 14 जिल्हे रेड झोनमध्ये, 16 ऑरेंज तर 6 ग्रीन झोनमध्ये गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. या जिल्ह्यांमध्ये त्यानुसार केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे नियोजन ठरवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राज्यात रेड झोनमध्ये 14 जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.  ऑरेंज झोनमध्ये  16 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार हे जिल्हे आहेत. तर कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात 6 असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

रेड, ऑरेंज, ग्रीन झोन ठरवण्याचा जुना निकष हा रुग्णसंख्या होता, पण त्यात बदल झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती, पण आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणता फॉर्म्युला वापरला आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

झोनची यादी डायनॅमिक : केंद्रीय आरोग्य सचिव 

केंद्रीय आरोग्य सचिव प्रिती सूदन यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, ही यादी डायनॅमिक आहे. वेगवेगळी माहिती अपडेट होत गेल्यावर प्रत्येक आठवड्यात तसंच आवश्यकता असेल तर त्यापूर्वीही (म्हणजे जसजशी नवी आकडेवारी उपलब्ध होईल त्यानुसार) बदलू शकते. या यादीतील रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांविषयी किंवा अन्य झोनमध्ये असलेल्या जिल्ह्याविषयी राज्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. राज्य सरकारांनी केंद्राच्या आणि डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्टनुसार जास्तीत जास्त सकारात्मक प्रतिसाद दिल्यास जिल्ह्याचा झोन बदलू शकतो, असं प्रिती सूदन यांच्या पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकारांना स्थानिक आकडेवारी आणि परिस्थितीनुसार ऑरेंज किंवा रेड झोनमधील जिल्ह्यांच्या संख्येत वाढ करण्याची मुभा आहे, असं देखील या पत्रात म्हटलंय.

Coronavirus | राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले : राजेश टोपे

रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही : मुख्यमंत्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही, रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतु ऑरेंज झोन मध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोन मधील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

झोनचे निकष बदलल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती 
राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले आहेत. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही तर असा जिल्हा ऑरेंज झोन तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. तर ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असेल. कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार 15 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

महाराष्ट्रात झोनिंग चुकीचे : वडेट्टीवार 

विजय वडेट्टीवार ह्यांनी महाराष्ट्रात झोनिंग चुकीचे झाल्याचा मुद्दा उचलला आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क करून केंद्राजवळ हा विषय उचलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपुरात एकही रुग्ण नसताना तो ऑरेंजमध्ये आहे. इतरही अकोला रेड झोनमध्ये असणे, अमरावती, बुलढाण्यात जास्त केसेस असताना ते रेड मध्ये न टाकता, ऑरेंजमध्ये टाकणे इत्यादी विषय उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.