यवतमाळ : पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. लहान मुले पाळण्यात टाकताच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला आहे. एक पाळण्यामुळेच आज सहा महिन्यांच्या तेजस व नऊ वर्षाच्या प्राचीला जगाला अखेरचा निरोप देऊन काळाच्या पडद्याआड गेली आहे.
विजय घुक्से हे शेतकरी पुसद येथील महावीर नगर येथे राहतात. विजय यांना चार अपत्य आहेत. मात्र आज घुक्से परिवार एका पाळण्यामुळे शोकाकुल आहे. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे. याच शेतात प्राचीचे वडील विजय घुक्से हे गाजर काढण्याचे काम करत होते. तर आई सारिका ही सहा महिन्याच्या तेजस या बाळाला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती. सकाळी 11 वाजता प्राची ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती केली. मात्र आईने तेजस ला झोका दे असे म्हणून आई ही पाणी आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर आदळला त्यामुळे प्राची बेशुद्ध झाली. तर तेजस हा जोरात बाजूला फेकला गेला.
आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आल्यावर संपूर्ण प्रकार बघितल्यानंतर आरडाओरड केली. वडील विजय यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. दोन्ही चिमुकल्यांचा निकृष्ट दर्जाच्या सिमेंट खांबामुळे जीव गेला. त्यामुळे अशा निकृष्ट खांबांचा वापर थांबविण्याची गरज आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha