मुंबई: राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र, तसा उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे.


समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' असा शब्दप्रयोग रुढ केला. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. याच धर्तीवर राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी 'विधवा' ऐवजी 'गंगा भागिरथी' हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असा आदेश लोढा यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे.


प्रस्तावावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही


महिला आयोगाकडून विधवा महिलांच्या नावाविषयी काही सूचना आल्या होत्या. ज्या सूचना आल्या होत्या त्यापैकी एक सूचना अशी होती की, महाराष्ट्रात महिलांसठी गंगाभारती हे नाव प्रचलित आहे. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी 'विधवा' ऐवजी 'गंगा भागिरथी' हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. सध्या हा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.  विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी हा प्रस्ताव पाठवल्याचे मंगलप्रसाद लोढा म्हणाले.  


पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? सुप्रिया सुळे यांचा सवाल 


मंगलप्रभात लोढा वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मला आश्चर्य वाटले, त्यांच्याशी मी फोनवरुन संपर्क करणार आहे. यात खरंच वेगळेपण करण्याची ऑर्डर काढून करण्याची गरज आहे का? श्रीमती हा शब्द वापरला जातो. तुम्ही त्यांना प्रेमाने काहीही म्हणू शकता परंतु सरकारने ऑर्डर काढून नावापुढे काहीतरी लावणे म्हणजे त्यांना वेगळे करणे आहे. विधवा हा शब्द कटू वाटतो त्यावर चर्चा होऊ शकते. पण त्याआधी लावाच असे सरकारनं सांगणे. एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? तुम्ही समतेची भाषा करता हा महिलांवर अन्याय नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.