मुंबई : शिवसेनेत (Shivena) झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पक्ष वाचवण्यासाठी तहानभूक विसरून राज्यभर दौरे करत आहेत. अशातच  आता आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या खांदंयाला खांदा लावून रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)  मैदानात  उतरणार आहेत.  रश्मी ठाकरे एप्रिलच्या  शेवटच्या आठवड्यात  राजकीय दौरै करणार आहेत. 


ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा अपूर्ण आहे. गेल्या पाच दशकांपासून या कुटुंबाने राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन त्याला आकार दिला आहे. पिढ्यानपिढ्या हे कुटुंब राजकारणाशी जोडले गेले आहे. आता यात रश्मी ठाकरेंची देखील एन्ट्री होणार आहे.  एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे नाशिक  दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची डागडुजी व पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  


विस्कटलेल्या संघटनात्मक बांधणीसाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे करणार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत. रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. याआधी त्यांनी वरळी तसंच शिवडीमधील कार्यक्रमांना रश्मी ठाकरे हजर होत्या. रश्मी ठाकरे या अनेक राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र त्यांनी आजपर्यंत कधीच राजकीय विषयांवर टिप्पणी केली नाही. रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे. नाशिकच्या  राजकारणात उलथापालथ सुरूच असून ठाकरे गटाला  उतरली कळा लागली आहे.  नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाचे काही माजी आमदार, माजी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा आज शिंदे गटात प्रवेश केलं आहे. त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात करणार प्रवेश केला आहे. 


सध्या अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या शिवसेनेसाठी आता ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत राज्यभरातील शिवसैनिकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील शिवसैनिकांनाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.  या अगोदर रश्मी ठाकरे शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या पत्नींना स्वत: रश्मी ठाकरे यांनी फोन लावला होता.  रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांच्याशी चर्चा देखील केल्या होत्या.