पंढरपूर : "ठाकरे सरकार हे  रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार," अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीच्या मदतीबाबत बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुत्सित टिप्पणी करुन आपले अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत आहेत. या सरकारची ही स्ट्रॅटेजीच बनली असून चक्रीवादळ असो, कोरोना असो, अतिवृष्टी -गारपीट असो किंवा महापूर अशा सर्वच काळात कधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार, कधी बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तर कधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री असे विविध वाद निर्माण करुन जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे," असा आरोपही त्यांनी केला.


पंढरपूर तालुक्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी दरेकर यांनी गावागावातील बांधावर गेले. यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. "निवडणुकीपूर्वी जी गारपीट झाली होती तेव्हा बांधावर जाऊन हेक्टरी 25 आणि 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी ठाकरे करत होते. आता तर त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली असताना उद्धव ठाकरे यांनी वाचन पाळावे आणि तात्काळ पंचनामे न करता मदत द्यावी," असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला. "तुमची जबाबदारी आधी पूर्ण करा आणि मग केंद्राकडे बोट दाखवा असे सांगताना ज्यांच्याकडे मदत मागायची त्यांच्यावर टीका, ही दुटप्पी भूमिका जनतेला कळते. केंद्र सरकार त्यांची जबाबदारी पूर्ण करणारच आहे पण तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळू नका," असं दरेकर यांनी सांगितलं.


"येत्या आठ दिवसात जर राज्य सरकारने मदत केली नाही तर भाजप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष उभारेल," असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला. पूरग्रस्त पाहणी दौरा संपल्यावर दरेकर यांनी कुंभार घाट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर आपले मनसे प्रदेश सरचिटणीस आणि जुने सहकारी दिलीपबापू धोत्रे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.


संबंधित बातम्या


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये, देवेंद्र फडणवीसांची टीका


परतीच्या पावसाचं संकट टळलेलं नाही, घाईगडबडीने निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री


Devendra Fadnavis | "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करू नका", देवेंद्र फडणवीसांची टीका