Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 27 फेब्रुवारी ते 4 मार्च यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या आठवड्यातील महत्वाची घडामोड म्हणजे पुणे मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा लागलेला निकाल. तसेच त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील निवडणुकींचा निकालही या आठवड्यात लागला आहे. तसेच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसह ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्यात केलेला भारताचा पराभव यासह विविध घडामोडी या आठवड्यात घडल्या आहे. पाहयुता या सर्व घटनांचा आढावा....
27 फेब्रुवारी 2023
संपूर्ण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखला जाणार
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता यावरुन पडदा उठला आहे. राज्य सरकारकडून याबाबत राजपत्र (Gazette) जारी करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून झाल्याचं सांगण्यात आले आहे. सोमवारी (27 फेब्रुवारी) उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असे राज्य सरकारने राजपत्र नोटिफिकेशन जारी केले. महसूल आणि वन विभागाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे.
Saroj Ahire : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंचा बाळासह विधीमंडळातून काढता पाय
राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) आपल्या बाळाला घेऊन विधीमंडळात दाखल झाल्या होत्या. मात्र बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्यानं त्यांना काही वेळातच विधीमंडळातून काढता पाय घ्यावा लागला. हिरकणी कक्षाची दूरवस्था पाहून सरोज अहिर यांनी नाराजी व्यक्त केली होती. हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज अहिर यांच्या डोळ्यात पाणी आले. नागपूर अधिवेशनात आमदार सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आल्यानंतर नागपुरात त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. या अधिवेशनालाही सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आहेत. परंतू हिरकणी कक्ष खराब असल्याने विधीमंडळातून त्यांनी काढता पाय घेतला होता. विधानभवनातील हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज आहिरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, राहुल शेवाळेंनी घेतली साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट
राज्यात मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) 27 फेब्रुवारीला साजरा झाला. या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट घेतली. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असं आश्वासन यावेळी साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवासन राव यांनी दिलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात साहित्य अकादमीकडून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अहवाल सोपवला गेला आहे. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय नवीन अहवाल सादर करेल. तिन्ही मंत्रालयाच्या माध्यमातून तातडीनं कार्यवाही केली जाईल.
28 फेब्रुवारी 2023
कांद्याच्या मुद्यावरुन सभागृहात गोंधळ
कांद्याचे पडलेले दर (Onion Rate), ‘नाफेड’मार्फत बंद असलेली कांदा खरेदी (Onion Procurement) आणि निर्यातबंदीवरून (Onion Export) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंगळवारी (ता. 28) जोरदार गोंधळ झाला. विधान परिषदेचे कामकाज पहिल्यांदा दोन वेळा आणि नंतर संपूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले.
तर विधान परिषदेत जोरदार गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी सभागृहाच्या पायऱ्यांवर कांद्याच्या माळा गळ्यात घालून आणि कांद्याच्या टोकऱ्या घेऊन आमदारांनी निदर्शने केली.
Anganwadi Worker Protest: अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अखेर राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. अगंणवाडी सेविकांच्या मानधनात 1 हजार 500 रुपायांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला जाईल आणि त्यांना पेन्शन योजनेचा लाभही घेता येईल. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी (Anganwad) कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून (27 फेब्रुवारीपासून) बेमुदत संप पुकारला होता. त्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
अवघ्या एका धावेने सामना जिंकत न्यूझीलंडनं रचला इतिहास
इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात वेलिंग्टनमध्ये पार पडलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडन केवळ एका रनच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. कसोटी सामन्यात असा रोमहर्षक विजय मिळवणं एक मोठी गोष्ट असून विशेष म्हणजे फॉलोऑन मिळूनही सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. या विजयामुळं एका खास क्लबमध्ये किवी संघाने एन्ट्री केली आहे. कसोटी क्रिकेट इतिहासात फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना जिंकणारा न्यूझीलंड हा जगातील तिसरा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड आणि भारताने ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या खास विजयामुळं न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे.
1 मार्च 2023
संजय राऊतांनी 'चोर'मंडळ म्हणताच सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. गद्दार गेल्यानंतर संघटन मजबूत होत असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरुन काढलं, तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला होता. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन बुधुवारी (1 मार्चला) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ झाला. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली.
2 मार्च 2023
कसब्यात रवींद्र धंगेकर ऐतिहासिक विजय तर चिंचवडमध्ये भाजपच
पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election Result) निकाल 2 मार्चला लागला. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव केला आहे.
चिंचवड मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) भाजपचीच (BJP) सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचं आव्हान होतं. महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) या निवडणुकीत कलाटेंच्या बंडखोरीचा फटका बसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
राज्यातील सत्तासंघर्ष, हरिश साळवेंचं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बोट
2 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी दोन तासातच संपली. आता होळीच्या सुट्टीनंतर पुढील कामकाज होणार आहे. पुढील सुनावणी 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. हरिश साळवे यांनी बुधुवारी सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद केला. हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर जोरदार टीका केली.
त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजपने गड राखला
ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मार्चला लागले. नागालँडमध्ये भाजप आघाडीला 37 तर त्रिपुरामध्ये 33 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांचा एनपीपी मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. NPP च्या खात्यात फक्त 26 जागा आल्या आहेत.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती गठित
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या (Adani Hinderburg Case) चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) समिती गठित करण्यात आली आहे. सहा जणांची समिती सुप्रीम कोर्टाकडून स्थापन करण्यात आली आहे. शेअर बाजारातील घसरणीचे कारण आणि गुंतवणुकदारांचे नुकसान याची चौकशी ही समिती करणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये एसबीआयचे माजी अध्यक्ष ओ पी भट्ट, ब्रिक्स कंट्रीच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे माजी प्रमुख के वी कामत, इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधारचे प्रवर्तक नंदन नीलकेणी, जस्टिस देवधर आणि शेअर बाजाराचे जाणकार सोमशेखर सुंदरेशन यांची निवड करण्यात आली आहे.
SSC Examination : दहावीच्या परीक्षेला सुरुवात
राज्यात 2 मार्चपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (Maharashtra Board) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला (SSC Exam) सुरुवात झाली आहे. बोर्डाकडून परीक्षेसाठीची जय्यत तयारी करण्यात आहे. या परीक्षेसाठी 15 लाख 77 हजार विद्यार्थी बसले आहेत. 5000 केंद्रांवर ही परीक्षा पाडत आहे. यंदाची दहावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून मोहीम राबवली जात आहे. कॉपीचे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी प्रत्येक केंद्रावर घेतली गेली आहे.
3 मार्च 2023
बुलढाण्यात 12 वी चा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा
बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये (Buldhana Sindkhed News) बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा (HSC Maths Paper Leak) सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोर्डाकडून मात्र पेपरफुटीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोर्ड अधिकृतरित्या माहिती देणार आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून सभागृहात पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अजित पवार म्हणाले की, "सिंदखेडचा राजा या ठिकाणी बारावीचा पेपर फुटला आहे. अभ्यास करणाऱ्यां विद्यार्थ्यांचं मोठ नुकसान झाले आहे."सरकार काय करणार असा सवाल अजति पवारांनी उपस्थित केला. अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या प्रकरणी संध्याकाळपर्यंत चौकशी करु अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली.
कफ सिरप तयार करणाऱ्या 4 कंपन्यांचे उत्पादन बंद, 27 कंपन्याची चौकशी
राज्य शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे (Food and Drug Administration) कफ सिरप तयार करणाऱ्या 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली. यातील 17 दोषी कंपन्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 4 कंपन्यांचे उत्पादन बंद तर 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली.
ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून केला भारताचा पराभव
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. उत्कृष्ट गोलंदाजी तसच संयमी फलंदाजीच्या जोरावर कांगारुंनी हा सामना सहज जिंकत 9 विकेट्सनी भारताला मात दिली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील या विजयासह मालिकेतील ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम असून सद्यस्थिती भारत 2 विजय तर ऑस्ट्रेलिया 1 विजय अशी आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. पहिल्या डावात भारत केवळ 109 धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारताने 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावाचं माफक लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने केवळ 1 विकेट गमावत ट्रेव्हिस हेडच्या नाबाद 49 आणि लाबुशेनच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर सामना जिंकला.
4 मार्च 2023
राजनामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव (Dharashiv) करण्यात आले आहे. मात्र याच निर्णयावरुन आता जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. नामांतराच्या निर्णयाचे कुठे समर्थन होत आहे तर कुठे विरोध करण्यात येत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी या निर्णयाला विरोध करत, कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला (MIM Protest) बसण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मनसेकडून (MNS) शहरात नामांतराच्या समर्थनात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात नामांतराच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
Old Pension Scheme : कोल्हापुरात जुन्या पेशनसाठी धडक मोर्चा
शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे 'एकच मिशन-जुनी पेन्शन' हे दाखवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात गांधी मैदानातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालायवार काल (4 मार्च) धडक मोर्चा काढण्यात आला. या मेळाव्यात शेकडो शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून सहभागी होत राज्य सरकारला निर्णायक इशारा देण्यात आला. येत्या बजेटमध्ये जुन्या पेन्शनची घोषणा करावी, अशी मागणी मोर्चाचे नेतृत्व करत असलेल्या सतेज पाटील यांनी केली. दरम्यान, या मोर्चात कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सुद्धा सामील झाले.