Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण देशासह राज्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा (Weekly Recap) आढावा घेत असतो. या आठवड्यात 2 ते 8 एप्रिल दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. गुरुवारी देशभरात हनुमान जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. छ. संभाजीनगरमधील मविआची वज्रमूठ सभा, शिक्षणाचा बाजार, बोगस शाळाचं पेव अशा विविध घडामोडी या आठवड्यात घडल्या. पाहुयात त्याचा एक आढावा....
2 एप्रिल
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
राज्यात हा आठवडा गाजला प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यातल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेने.. या सभेने नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली. (वाचा सविस्तर )
3 एप्रिल
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण
छ.संभाजीनगरमधल्या सभेचे पडसाद संपत नाहीत तोवरच ठाण्यातील शिवसेनेच्या एका कार्यकर्तीला मारहाण करण्यात आली आणि त्याचे पडसाद पुढे दोन दिवस कायम राहिले. मारहाणीची तक्रार तर दूरच पण सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचं निमित्त करुन त्या कार्यकर्तीवरच गुन्हा दाखल करण्यात आला. (वाचा सविस्तर )
4 एप्रिल
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाणीच्या निषेधार्थ मविआचा ठाण्यात मोर्चा
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाणीच्या निषेधार्थ मविआने ठाण्यात एक मोर्चा आणि एका जाहीर सभेचं आयोजन केलं. (वाचा सविस्तर )
4 एप्रिल
कोण फडतूस? तर कोण काडतूस?
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असं संबोधत टीका केली आणि मुख्य मुद्दा बाजूला फेकला गेला आणि नव्या वादाला तोंड फुटलं. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फडतूसला ते काडतूस असल्याचं प्रत्युत्तर दिलं. (वाचा सविस्तर )
4 एप्रिल
मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत मास कॉपिंगचा प्रकार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत धक्कादायक गैरप्रकार समोर आला. परीक्षेत काहीच येत नसेल तर तुम्ही चक्क पेपर कोरा ठेवायचा आणि नंतर काही दोन-पाचशे रुपये देऊन सर्व पेपर सविस्तर सोडवायचा.. अशी मास कॉपिंगची ही ऑफर राज्यात यापूर्वी कधी ऐकायलाही मिळाली नसावी.. शिक्षणाचा बाजार म्हणजे यापेक्षा वेगळं काय असेल? बातम्या प्रकाशित झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने चौकशी समिती नेमली आणि मास कॉपिंगचा बाजार मांडणारं हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलं. (वाचा सविस्तर )
6 एप्रिल
राज्यात तब्बल 800 शाळा बोगस
छ.संभाजीनगरच्या या बातमीसोबतच पुण्यातूनही शाळांच्या संदर्भातील एक महत्वाची बातमी गुरुवारी आली. त्यानुसार राज्यात तब्बल 800 शाळा या चक्क बोगस असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलीय. त्यातील जवळपास 100 शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर 700 शाळांची तपासणी सुरु आहे. या शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि राज्य शिक्षण मंडळ अशा सर्वच बोर्डाच्या तसंच माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे, हे खूपच गंभीर म्हणावं लागेल. एकीकडे पटसंख्येचा निकष लावून शाळा बंद करण्याचा निर्णय घेणारी आपली व्यवस्था अशा बोगस शाळा सुरु होतात, तरी त्यावर त्या वेगाने कारवाई करत नाही. बोगस शाळा असल्याचा संशय असलेल्या तब्बल 800 शाळांपैकी आतापर्यंत फक्त 100 शाळा बंद करण्यात आल्यात. (सविस्तर बातमी )
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा धुमाकूळ
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आंबा, काजू, आंबा गळून पडला आहे. द्राक्षांच्या बागावरही विपरित परिणाण झाला आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या अवकाळीने प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे. (वाचा सविस्तर)
7 एप्रिल
सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात
महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅसचा दर निश्चित केल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने काही तासांतच सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 8 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय, स्वयंपाकांसाठी वापरण्यात येणारा पीएनजी गॅसच्या दरात 5 पाच रुपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून, 8 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर ही दर कपात लागू झाली आहे. (वाचा सविस्तर)
8 एप्रिल
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. (वाचा सविस्तर)
8 एप्रिल
अयोध्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री मुंबईहून रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले . मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याची मोठी तयारी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबई विमानतळावरुन लखनौकडे उड्डाण केलं. रात्री लखनौमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी (9 एप्रिल) दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. शिंदे यांच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी झाले आहेत. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे देखील अयोध्येला रवाना झाले आहेत. (वाचा सविस्तर)