Chh. Sambhaji Nagar Sabha: तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारला दिलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. 


न्यायव्यवस्था भाजपच्या हाती जाईल तो दिवस लोकशाहीचा शेवटचा दिवस 


भाजपने न्यायव्यवस्था ही आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, तो दिवस लोकशाहीचा शेवटचा दिवस असेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. इस्त्रायलमध्ये हाच प्रकार होत असून त्याच्याविरोधात सगळी जनता आणि अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विरोधी पक्षांना त्रास दिला जातोय, मेघालयात ज्या संगमांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, आता त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली. भारतीय जनता पक्ष म्हणून भ्रष्टाचारांना सोबत घेत असाल तर भारतीय जनतेचा अपमान आहे. तुमचे हिंदुत्व आम्ही मानणार नाही. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे आता संधीसाधू दिसतात. सावरकर याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आहे का? 


काश्मीरची एक न एक इंच जमीन घ्या, मग आम्ही मानू; उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान


अमित शाह म्हणाले की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, पण जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमीन घेऊन दाखवा, तर आम्ही मानू. वल्लभभाईंचा पुतळा उभा केला, देशभरातून पोलाद गोळा केले, पण त्या पोलादाचा एक कण तरी धमन्यामध्ये आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 


तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा, मग समजेल महाराष्ट्राची जनता कुणाच्या मागे आहे; उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान


माझा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, वडीलही चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या वडिलांना काय वाटत असेल अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा, मी माझ्या बापाच्या नावाने मतं मागतो, मग समजेल महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे असं आव्हानही त्यांनी दिलं. 


नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना भाजपला हिंदू आक्रोश करावा लागतोय हे दुर्दैवी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला


या देशाचा पंतप्रधान हिंदू असतानाही भाजप हिंदू आक्रोश यात्रा काढते, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना या देशात हिंदू सुरक्षित नाहीत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला. 


आपण काही करायचं नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं, यांनीच दंगली केल्या; उद्धव ठाकरेंचा आरोप


या आधीही मी संभाजीनगरला आलोय, याच शहरात 1988 साली महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आली आणि शिवसेनाप्रमुखांनी या शहराचं नाव बदललं, संभाजीनगर. गेली 25 वर्षे आपण भ्रमात होतो, भाजपसोबत आपली युती होती. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. पण महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भाजपला जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. करायचं काय नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं ही भाजपची खेळी. दंगली घडवल्या जातात, त्यामुळे निवडणुका जवळ आल्याचं समजू घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


पंतप्रधानांची पदवी विचारल्यावर 25 हजारांचा दंड भरावा लागतोय 


एका बाजूला पदवी दाखवूनसुद्धा युवकांना नोकरी मिळत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी विचारली तर 25 हजारांचा दंड भरावा लागतो. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी पंतप्रधान झाला, त्याचा अभिमान त्या महाविद्यालयाला कसा झाला नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. 


मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा अपमान केला, मुक्तीसंग्राम सभेला फक्त 13 मिनिटी दिली; अजित पवारांचा आरोप


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा अपमान केला. मुक्तीसंग्रामच्या कार्यक्रमाला केवळ 13 मिनिटे दिली हे चुकीचं आहे असं अजित पवार म्हणाले. 


शिवरायांचा अपमान झाला होता त्यावेळी काय दातखिळी बसली होती का? अजित पवारांचा शिंदे-भाजपवर हल्लाबोल


सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्यं केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा सवाल अजित पवार यांनी केला. हे शक्तीहीन सरकार असल्याचं सर्वोच्च न्यायायलाने म्हटलं. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे असंही ते म्हणाले. 


या सरकारचा पायगुण चांगला नाही, राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत: अजित पवार


अवकाळी नुकसान,विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, या सरकारचा पायगुण चांगला नाही, हे आल्यापासून राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. 


हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या; अजित पवारांचे भाजपला आव्हान


भाजप-शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं. 


इतकी वर्षे दंगल होऊ दिली नाही, आता दंगली होतायत; चंद्रकांत खैरेंचा आरोप


आजची सभा होऊ नये यासाठी पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. शिवसेना फोडण्याचं काम फडणवीसांनी केलं असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं. सावरकरांना भारतरत्न देत नाही, पण त्यांच्या नावाने यात्रा काढता असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केला. 


दिल्लीश्वराला गाडायची ताकद मराठवाड्याने दाखवली आहे : धनंजय मुंडे 


छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्ला चढवला. या राज्याला आणि देशाला जर कुणी खऱ्या अर्थाने मुर्ख बनवलं असेल तर ते भाजपच्या कमळाने बनवलं अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. दिल्लीश्वराला गाडायची ताकद मराठवाड्याने दाखवली असल्याचे ते म्हणाले. सभेला घाबरून भाजप शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा सुरु असल्याचे म्हणाले. सरकारला चोर म्हटल्यास कधी सदस्यत्व जाईल याचा नेम नसल्याचे ते म्हणाले. 


अदानींच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये कुठून आले याचं उत्तर सरकाराने दिलं नाही: बाळासाहेब थोरात


कोरोना काळात राज्यातील परिस्थिती महाविकास आघडीच्या सरकारने योग्य पद्धतीने हाताळले असं सांगत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "आम्ही कांद्याला हमीभाव मिळवा म्हणून आंदोलन केले. नाफेडने अद्याप कांदा खरेदी सुरू केली नाही. सरकार विरोधी कोणी बोलले तर कारवाई केली जाते. 3 हजार 560 किलोमीटर राहुल गांधी पायी चालले यशस्वी पदयात्रा काढली. महागाई, बेरोजगारी बाबत जागृती केली. अदानी जगातील दोन नंबरचे श्रीमंत कसे झाले? राहुल गांधी परदेशात बोलले, त्यानंतर सभागृहात बोलण्याची संधी मागितली मात्र बोलू दिले नाही. अदानींच्या खात्यात 20 हजार कोटी आले कुठून याचं उत्तर सरकारने दिलं नाही."


निर्णय बेभान, प्रसिद्धी वेगवान असं हे सरकार; अशोक चव्हाणांची शिंदे-फडणवीसांवर टीका


राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला, निर्णय वेगवान, विकास गतीमान असं हे सरकार म्हणतंय, पण 'निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान' अशी स्थिती या सरकारची असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं. 


राज्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार: अजित पवार 


जेव्हा जेव्हा राज्यावर संकट येतं, त्यावेळी मराठी माणून पेटून उठतो असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. राज्यात महाविकास सरकार असताना ते कोणत्या परिस्थिती अस्तित्वात आलं हे पटवून देण्यासाठी सभा घेणार होतो, पण मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार.