ठाणे : सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरेंच्या समर्थकांमधली धूसफूस ठाण्यातून वारंवार समोर येत होती. मात्र सोमवारी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरुन मारहाण करण्यात आली.  शिंदेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मारहाण केली. रोशनी शिंदे यांच्यावर  ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात (Roshni Shinde Shifted to Lilavati Hospital) हलवण्यात आले आहे.  


उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार शरसंधान साधलं ज्यावरुन राजकारण पेटलंय. रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे.  काल समोर आलेल्या रिपोर्टनुसार रोशनी शिंदे यांना कोणतीही गंभीर दुखापत नाही असंच नमूद करण्यात आलंय  तसंच त्या गर्भवती नसल्याचंही सांगण्यात आलंय 


ठाकरे कुटुंबियांनी घेतली रोशनी यांची भेट


ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथं जाऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विचारपूस केली. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून सोमवारी संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचा आज मोर्चा


ठाण्यात आज ठाकरे गट मोठा मोर्चा काढणार आहे.. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्या तक्रारीनंतरही कारवाई केली नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.


काय आहे प्रकरण?


ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. या अर्जाद्वारे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले. मात्र त्यानंतर रोशनी शिंदे यांच्याच अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सोमवार 4 एप्रिल रोजी संध्याकाळी रोशनी शिंदे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  पहिला गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांच्या तक्रारीवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे रोशनी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी भाजप पदाधिकारी संजय वाघोले यांनी देखील गुन्हा दाखल केला आहे. वाघोले यांच्या तक्रारीनंतर कलम 153 अ-1, कलम 499, कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.