Maharashtra Cold Weather : महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून दक्षिण भारतात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. नाताळनंतर काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात घट होईल.


परभणी जिल्हा गारठला, तापमान 10.08 अंशावर 


परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासुन थंडीची लाट पसरली असुन कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठलाय. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याचे तापमान 10.08 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे.


गारवा वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा


डिसेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत नव्हता, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 15 अंश पर्यंत खाली आले आहे. वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असून पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र थंडीचा कडाका वाढला असून थंडी पासून बचावासाठी नागरिकांना शकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.


गहू, हरभरा, कांदा पिकाला पोषक वातावरण


वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये थंडी जाणवू लागल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात हुडहुडी वाढू लागली असून या थंडीपासून बचाव करण्याकरिता गरम आणि उबदार कपडे परिधान करायला सुरुवात केली आहे. तर, जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहे. तर, काही वयोवृध्द नागरिक थंडीत घराबाहेर पडणे देखील टाळत आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शेतीपिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असून वाढत्या थंडीचा फायदा हा कांदा, गहू, हरभरा या पिकांना होताना दिसून येत आहे.