Maharashtra Weather Update Today : राज्यासह देशातील हवामान (Weather Forecast) सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. डिसेंबर (December) महिना संपायला आला तरी, दरवर्षीप्रमाणे थंडी (Winter) पडलेली नाही. त्याउलट कधी ऊन तर कधी पाऊस (Rain) असं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागात तापमानात घट होऊन गारठा वाढणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यात गारठा वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 13 डिसेंबरपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आह. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.


राज्यात थंडीचा जोर वाढणार


मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदललं होतं. पण आता पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने थंडीचा जोर वाढत आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पारा घसरेल आणि काही ठिकाणी थंडी वाढू शकते. येत्या 5 ते 6 दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. मात्र, पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या अंतर्गत भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रात्री जास्त थंड राहतील.


'या' भागात पावसाची शक्यता


महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी, काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात पावसाचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. 


13 डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाची शक्यता


अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच संपण्याची शक्यता आहे. 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी उत्तर भारतात सतत दाखल होत असलेल्या पश्चिम मान्सूनमुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे सकाळची दृश्यमानता कमी होऊन थंडी आणि धुक्याची चादर पाहायला मिळेल. पुढील काही दिवसांत पूर्व महाराष्ट्रातील अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता नसून थंडी वाढण्याचा अंदाज आहे.