Maharashtra Weather Update: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain Update) पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी धरण साठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठी जमा झाला आहे. अशातच हवामान विभागाने आज (22 ऑगस्ट) रोजी राज्यभरात विजांसह मुसळधार पावसाचा (Heavy Rain) यलो अलर्ट जारी केला आहे.


राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागांमध्ये मंगळवारपर्यंत वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain Update) पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्याच्या काही भागांत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.


मध्य बांगलादेश व लगतच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर बांगलादेशात सक्रिय झाला आहे. कर्नाटक किनारपट्टीवरील पूर्व मध्य अरबी समुद्रापासून मालदीव भागापर्यंत असलेला कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली असून आग्नेय अरबी समुद्र ते गुजरातपर्यंत हवेच्या वरच्या भागावर चक्रीय स्थिती असून, त्याचा प्रभाव वाढलेला आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल असा अंदाज आहे. 


आज कोणत्या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'


 पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर,जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


पुणे शहर परिसरात पावसाची हजेरी


पुणे शहर आणि परिसरात काल(बुधवारी) दुपारनंतर काही काळ जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावरून चांगलेच पाणी वाहताना दिसलं. पुणे शहरात 27 ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain Update) पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू आहे


अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं होतं, नागरिकांना वाहने चालवताना मोठ्या अडचणी येत होत्या.अशातच पुणे शहर परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार अनेक ठिकाणी खड्डे पडत आहेत. दरम्यान पुढील 27 ऑगस्टपर्यंत शहर परिसरात दुपारनंतर पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.