नाशिक : मराठा आंदोलकांवर आंतरवाली सराटीत अमानुष लाठीचार्ज झाला होता. बदलापूरमध्ये (Badlapur) बालिका अत्याचाराचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर देखील लाठीचार्ज झाला. महाराष्ट्रात हा निर्दयीपणा सुरू आहे. लाठीहल्ल्याचा आदेश देणारा एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यातील खरा जनरल डायर कोण? हा जनरल डायर महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, अशी टीका युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  


आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य खोके आणि मिंधे सरकार हटविण्याची वाट जनता बघत आहे. मात्र, मिंध्यांना निवडणुकीची भीती वाटत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या महापालिकेच्या निवडणुका (Election) घेण्यात आलेल्या नाही. नगरसेवक, लोकप्रतिनिधी नसल्याने महापालिकेच्या कामांचा बट्टाबोळ झाला आहे. 


महिलांसाठी शक्ती कायदा करणार


प्रशासकांच्या माध्यमातून शहरांची लूट सुरू आहे. मात्र, आपले सरकार आल्यानंतर भ्रष्ट अधिकारी आणि लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच आहोत. तसेच यांना आता लाडकी बहीण आठवली. मी सांगतो लाडकी बहीण आम्ही बंद करणार नाही तर त्यात वाढ करून राज्यातील महिलांसाठी शक्ती कायदा करणार, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.


त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही


ते पुढे म्हणाले की, मुंबई- गोवा, मुंबई-नाशिक, मुंबई अहमदाबाद या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे. मिंधे या रस्ताने गुवाहाटीला पळाले असते तर त्यांनी रस्त्यांची दुर्दशा दिसली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. मिंधे सरकारचे कामात लक्ष नाही. खोके आणि कमीशन घेत राज्याची लूट करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. मिंध्यांना निवडणुकीची भाती वाटत असल्याने जनतेने भाजप आणि मिंध्यांना नाकारले आहे, त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांना पराभव समोर दिसत असल्याने येणारा प्रत्येक दिवस आपला आणि आपल्या लाडक्या कंत्राटदारांचा या धोरणाने ते राज्याची लूट करत आहेत. 


आमचं सरकार आल्यावर बहि‍णींना वाढीव रकमेसह सुरक्षाही देणार


आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र, बहिणींना पैसे नको, सुरक्षा हवी आहे. महिलांवर अत्याचार करणारे मंत्री आहेत. सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणारे मंत्री आहेत. ते बहिणींना भाऊ वाटतात का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी महिलांना केला. आता पराभव समोर दिसत असल्याने पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यात येईल, असे ते सांगत आहे. मात्र, भूलथापा न देता हिंमत असेल तर वाढीव रक्कम आताच द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. आमचेच सरकार येणार आहे, हे निश्चित आहे. त्यावेळी आम्ही बहिणींना वाढीव रक्कम तर देऊच, शिवाय सुरक्षाही देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. 


बडगुजरांची ठाकरेंकडे 8 जागांची मागणी


दरम्यान, लोकसभेला शिवसैनिकांनी परिश्रम घेत गद्दाराला गाडत राजाभाऊ वाजे यांना बहुमताने विजयी केले. नाशिक लोकसभेसह जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद असून विधानसभेला पंधरापैकी आठ जागा मिळाव्या, अशी मागणी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. तसेच महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त केला.


आणखी वाचा 


Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी