मुंबई : मान्सून (Monsoon) महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाची (Rain) जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची अपेक्षा आहे. मान्सूनचं प्रतिक्षा लागलेली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसानं झोडपलं आहे.


विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस


आयएमडीच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासोबत मध्यम पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.






सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता


दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह आणि 50-60 किमी प्रतितास वेग सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मुंबई, ठाणेसह या भागात पावसाची शक्यता


मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.


मान्सूनची वाटचाल कशी सुरु आहे?


दरम्यान, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, कर्नाटकचा उर्वरित भाग, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा आणि किनारपट्टीचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 3-4 दिवसात या मार्गाने मान्सून पुढे सरकेल.