Weather Update:एकीकडे राज्यात गारठा वाढू लागलेला असताना आता पुढील दोन दिवस राज्यात पावसाची (Rain Alert)शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि मध्य-उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं वर्तवल्यानं आता पुन्हा नागरिकांना गारठ्यासह हलक्या पावसाच्या सरीही गाठणार आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यात तापमानात चढउतार होत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. रब्बी पिकांचे यात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा थंडीची चाहूल लागली. पण आता परत एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. (IMD Forecast)
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थानसह त्यालगतच्या परिसरात आहे. हेच चक्राकार वारे पश्चिम मध्य अरबी समु्रावरून पुढे सरकणार असल्याने राज्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय. येत्या काही तासात वाऱ्याचा वेग वाढणार असून 45-55 किमी प्रतितास वेगाने हे वारे वाहतील. परिणामी अरबी समुद्राच्या नैऋत्येकडील मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशाराही देण्यात आलाय.
उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या सरींचा पाऊस
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाला पोषक वातावरण झाले असून अनेक भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हळूहळू कमाल तापमान 2-3 अंशांनी कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर येत्या 24 तासांत हा बदल होणार असून विदर्भात किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार आहे.
येत्या 3 दिवसांत कसं राहणार तापमान?
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा घटनाचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये 10 अंशाच्या खाली तापमान गेलंय. राज्यातील कमाल तापमानही 2 ते 3 अंशांनी घसरणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात हळूहळू दोन ते तीन अंशांनी कमाल तापमान हे घसरणार आहे. तर किमान तापमान पुढील 3 दिवसात दोन ते तीन अंशांनी घसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.गेल्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशावर गेला असल्यानं नागरिक उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झाले होते. आता पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार झालंय. येत्या दोन ते तीन दिवसात हळूहळू तापमान कमी होणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-