बीड : 'यांनी बीडला बिहार नाही तर काबुलीस्तान अन् हमास केला. तालिबानीपेक्षा वेगळं वागणं नाही तुमचं'. सुरेश धस यांचा हाच आक्रोश पुण्यातल्या जनआक्रोश मोर्चात सर्वाधिक लक्षवेधी ठरला. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुण्यात निघालेल्या मोर्चात सर्वपक्षीयांनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. देशमुखांच्या हत्येपूर्वी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झालेल्या डीलचे तपशील सांगत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली. पुणेकरांना पुण्याच्या इतिहासाची आठवण करून देत बीडचा हमास केल्याचा टोला सुरेश धसांनी लगावला.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निघालेल्या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांनी हजेरी लावली. धनंजय मुंडे गो बॅक, परळी म्हणजेच बिहार असे थेट हल्लाबोल करणारे बोर्ड हातात घेऊन मोर्चेकऱ्यांनी पुण्यात चांगलीच गर्दी केली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांची वाणी या गर्दीसमोर अधिकच तिखट झाली.
पुण्याच्या इतिहासाची आठवण
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पुणेकरांनाच पुण्याच्या इतिहासाची आठवण करून दिली. शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी इथं कापली. रामशास्त्री प्रभुणेंनी याच पुण्यात पवित्र न्यायदानाचं काम केलं. तो बाा मनात ठेवून भविष्यात हे चिलेपिले लेकरंबाळं यांचं छत्र हरपून घेणारे आका असो किंवा मोठा आका असो, यांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणीच सुरेश धसांनी केली.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातले आरोपी पुण्यात सापडले असल्याच्या मुद्द्याला स्पर्श करत वाल्मिक कराडच्या काळ्या धंद्यांचे पुरावे कुठे सापडतील हेदेखील सुरेश धसांनी सांगितलं. सुरेश धस म्हणाले की, "गँग्स ऑफ परळीमुळं पुण्याचं नाव खराब होईल. आमचे वाल्मिकअण्णा उर्फ आका किती मोबाईल वापरतात? नितीन कुलकर्णी हा आणि आका दोघे मिळून सतरा मोबाईल नंबर वापरतात. आका आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी हा गायब झाला आहे. त्याला आणा आणि सगळे पुरावे या 17 मोबाईलमध्ये सापडतील."
धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक
संतोष देशमुख हत्येचा कट कसा शिजला, कुठे शिजला, कितीचं डील झालं, या सगळ्याचा ‘कच्चा चिठ्ठा’च सुरेश धस यांनी व्यासपीठावरून मांडला. सुरेश धस म्हणाले की, "14 जूनला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड अनंत काळकुटे, आवादा कंपनीचे शुक्ला यांची परळीला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली. बैठकीत डील 3 कोटीला फायनल झाली. आका क्या बोले, थ्री करोड लाके दो.. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी यांच्या हातात दिले आहेत. ते कुणी घेतले माहीत नाही."
सुरेश धस केवळ आरोप करून थांबले नाहीत. तर आरोप चुकीचे निघाले तर त्याचं काय प्रायश्चित्त आपण घेणार, हेही सांगून टाकलं. ही बैठक झाल्याचं खोटं निघालं तर राजकारण सोडेन. आत्ता 300 गायींचा गोठा आहे. 1000 गायींचा गोठा करेन. दोन तीनशे म्हसाडंही आणेन. म्हसाडं धूत बसेन. पण राजकारणात राहणार नाही असं आव्हान सुरेश धस यांनी दिलं.
बीडमधील दादागिरीमुळे जगणं अवघड
सत्ताधारी सुरेश धसांप्रमाणंच विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही बीडच्या दादागिरीचं वास्तव मांडत धनंजय मुंडेवर कारवाई करण्याची मागणी केली. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, "बीड जिल्ह्यातील दादागिरीनं जगणं मुश्कील केलंय. ही दादागिरी फक्त निवडणुकीपुरती राहिली नाही. घरातल्या मुलीबाळी, समाजबांधवांना बाहेर निघणं मुश्कील करून टाकलंय."
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्बणाले की, "कुणाचीही गय केली नाही पाहिजे. आरोपी कितीही मोठ्या व्यक्तीच्या जवळचा असला तरी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे हे दाखवून दिलं पाहिजे. हे आज महाराष्ट्रात दिसत नाही."
संतोष देशमुखांच्या मुलीचं भावनिक आवाहन
संतोष देशमुखांच्या लेकीनंही उपस्थित पुणेकरांना भावनिक साद घालत आपल्या पाठीवर वडिलांप्रमाणे हात ठेवण्याची साद घातली. माझ्या वडिलांवर अन्याय झालाय. न्याय मिळवण्यासाठी तुम्ही एकत्र आहात. वडिलांचा हात जसा मुलीच्या पाठीवर राहतो, तसा तुमचा हात माझ्या पाठिवर राहू द्या असं भावनिक आवाहन वैभवी देशमुखने केलं.
धनंजय मुंडेंचं थेट नाव
गुन्ह्याचा तपास आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा अशा दोन पातळ्यांवर सध्या संघर्ष सुरु आहे. पुण्यातल्या या मोर्चात आका या शब्दाचा वापर कमी होऊन थेट वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असा थेट उल्लेख होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसलं. धनंजय मुंडेंविरोधात सर्वपक्षीय नेते अधिक आक्रमक झाल्याची झलक पुण्याच्या मोर्चात दिसून आली. मोर्चेकऱ्यांचा हा आक्रोश धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत पुनर्विचार करण्यासाठी सरकारला भाग पाडणार का, हे लवकरच कळेल.
ही बातमी वाचा: