मुंबई : एप्रिल महिन्यात तापमानात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली, आता मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. मे महिना नागरिकांसाठी उष्णतेचा महिना असेल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. वाढत्या उष्णतेपासून काळजी घ्या, असं आवाहनही हवामान विभागाने केला आहे.
हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील. कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहील. मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट राहील. मुंबईत कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.
या भागात पावसाची शक्यता
विदर्भातील कमाल आणि किमान तापमान सध्या सामान्य असून तेथे सामान्य उष्णता राहील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मुंबई आणि ठाण्यात असह्य उन्हाचा सामना करावा लागणार आहे. उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
तापमानात प्रचंड वाढ होण्याचा अंदाज
आयएमडीने (IMD) सांगितले की, पुढील काही दिवसात कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाहीत. उलट काही दिवसांत तापमान हळूहळू 2-3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. 4 मे रोजी उत्तर कोकणातील ठाणे, रायगड यासह वेगळ्या भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.