PM Modi on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर त्यांच्या मदतीला पहिल्यांदा धावून जाईन, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. अडचणीत उद्धव ठाकरे यांना मदत करणारा मी पहिला असेन, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजारपणात रश्मी वहिनींना रोज फोन करुन त्यांची विचारपूस केली, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं आहे.


...तर मी नेहमीच उद्धव ठाकरेंचा सन्मान


पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र. उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी वहिनींना फोन करुन नेहमी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी शस्रक्रिया करण्याआधीही मला फोन केला होता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की, आधी ऑपरेशन करुन घ्या, तब्येतीकडे लक्ष द्या. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून मी नेहमीच उद्धव ठाकरेंचा मान-सन्मान करेन. ते माझे शत्रू नाहीत. उद्या काही संकट आलं तर, त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?


शिवसेना आणि घराणेशाही या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी रश्मी वहिनींना रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.


मोदींकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा


बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत, तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. माझी बाळासाहेबांना वाहिलेली ती श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणालो होतो की, मला उद्धव ठाकरे यांनी कितीही शिव्या दिल्या तरी, मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन, असं सांगत मोदींनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.