Vidarbha Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. तर खराब वातावरण आणि मुसळधार पावसामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पुसद दौरा रद्द करण्यात आला आहे. यवतमाळच्या पुसद मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. खराब वातावरण आणि पावसामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली आहे.


पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. शनिवाराच्या दुपारपासून कोसळणाऱ्या पावसाने अनेक ओढे, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर पुढील काही तास पावसाचा जोर कायम असल्याच्या इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अशातच भंडाऱ्यात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे. त्यामुळे पवासचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


रात्रीभरात 53 मंडळात अतिवृष्टी, पावसाचा रेड अलर्ट जारी


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात दिवसभवर रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. काल रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. अशातच काल रात्री जिल्ह्यातील 53 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. महागावच्या अधरपूस प्रकल्पाचे 10 गेट एक सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 1080 पाण्याचा विसर्ग यातून होत आहे. तर बेंबळा प्रकल्पाचे दहा दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून पाणी पातळी नियंत्रण आणली जात आहे. पुसद येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी SDRF चे एक पथक नागपूरवरून बोलावण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता सर्व  विभाग प्रमुख यांना मुख्यालयीच राहण्याचे निर्देश दिले आहे. या पावसामुळे पुसद तालुक्यातील ईसापुर ते शेंबाळपिंपरी, पुसद ते वाशिम, यवतमाळ ते पुसद, दिग्रस ते पुसद हे रस्ते बंद झाले आहेत 


सातपुडा पर्वतरांगात 'जोर' धार  


मुसळधार पावसामुळे अकोल्यातील पोपटखेड धरणाचे दरवाजे उघण्यात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातल्या सातपुडा पायथ्याशी असलेले पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघण्यात आले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या सततंधार पावसामुळे पोपटखेड धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झालीये.  परिणामी, आज धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.


विदर्भ मराठवाड्याच्या संपर्क तुटला


रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महागाव, पुसद तालुक्याला चांगलेच झोडपले असुन नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. या भागात शेतीचे मोठे नुकसानही झाले आहे. या पावसामुळे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील धनोडा येथील पैंनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या संपर्क तुटला आहे. आज सकाळी साडे दहा वाजतापसून पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांना यावरून वाहतूक करू नये, अशा सूचना प्रसासनकडून देण्यात आल्या आहे. 


हे ही वाचा