Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडी प्रचंड वाढली असून अगदी मुंबईसारख्या शहरांमध्येही थंडी जाणवत आहे. दरम्यान ग्रामीण भागात तर थंडीने कहर केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होणार असून रात्री किंवा पहाटेच नाही तर दिवसभर वातावरणात गारवा राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


महाराष्ट्रात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी कमी होण्यास सुरुवात होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 48 तासांत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे. ही थंडी पुढील दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतरही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही थंडी कायम राहणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी कमी होण्यास सुरुवात होईल.


मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्याचप्रमाणे पुण्याचे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि नीच्चांकी तापमान 12 अंश सेल्सिअस होते. दरम्यान, राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली आहे. धुळे तापमान 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या थंडीचा फटका रब्बी पिकांना होणार आहे. परभणीत सलग तिसऱ्या दिवशी तापमान 10 अंशाखाली आलं आहे. परभणी जिल्ह्याचे तापमान 7.6 अंशावर खाली घसरलं असून थंडीचा फायदा गहू आणि हरभरा पिकाला होत आहे. बुलढाण्यात तापमान 12.4 अंश सेल्सिअस इतकं आहे. 


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha